Nashik Navratri Festival : नवरात्रीत गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका; डॉ. प्रवीण तोगडिया यांची मागणी
esakal September 23, 2025 06:45 AM

नाशिक: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पराक्रमाची शर्थ केली. जगाच्या नकाशावरून पाकिस्तान मिटविण्याची संधी होती. परंतु ही संधी गमावल्याची खंत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली. पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्यावरूनही त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

विशाल हिंदू हुंकार सभा व त्रिशुल दिक्षेसाठी रविवारी (ता.२१) नाशिकमध्ये डॉ. तोगडिया आले असता पत्रकारांशी संवाद साधला. अखंड भारताच्या स्वप्नांचा पुनरुच्चार करीत डॉ. तोगडिया म्हणाले, दुर्गापूजा हा हिंदूचा सण आहे, मुस्लिम मूर्तिपूजा करीत नाहीत. त्यामुळे नवरात्रोत्सवात मुस्लिमांना गरब्यात प्रवेश देऊ नये.

गरब्यात प्रवेश देताना ओळखपत्र तपासले जाते. मुस्लिमांना सरकारने प्रवेश देऊ नये. हिंदू कधी मशिदीत जात नाही. त्यांनीही गरबा-दांडियात येऊ नये. यावरून दंगल झाल्यास त्यास सरकार जबाबदार असेल असाही गर्भित इशारा दिला.

Navaratri 2025 Zodiac Mantras: दुर्गा देवीचे 12 राशींसाठी खास मंत्र, वाचा एका क्लिकवर

नाशिक कुंभमेळा तयारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत डॉ. तोगडिया यांनी, आपण साधू महंतांशी चर्चा केली असून त्यांनी नाराजी दर्शविली आहे. परंतु राज्यातील फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे. कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरु करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. मालेगाव बॉम्बस्फोटात न्यायालयाने हिंदूंना न्याय दिला. हिंदू दहशतवादी टॅग लावल्याने काही होत नाही. हा देश हिंदूंचा असल्याची टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.