आशिया कप 2025 स्पर्धेतल्या सुपर 4 फेरीतील चौथा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आशिया कप स्पर्धेत बांगलादेशने चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशने साखळी फेरीत तीन पैकी दोन सामने जिंकून सुपर 4 फेरी गाठली होती. तसेच सुपर 4 फेरीत श्रीलंकेचा पराभव करून मोठा उलटफेर केला आहे. दुसरीकडे, भारताने एकही सामना गमावलेला नाही. असं असताना या सामन्यापूर्वी बांग्लादेश संघाला धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास जखमी झाला आहे. आयसीसी अकादमी ग्राउंडवर सरावादरम्यान त्याच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे फलंदाजी करताना त्रास जाणवू लागला आणि जमिनीवरच कोसळला. यामुळे त्याला सराव अर्धवट सोडून बाहेर जावं लागलं. लिटन दासला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबत काही कळलेलं नाही. पण स्क्वेअर कट मारताना त्याच्या पाठीला दुखापत झाली. यानंतर संघाचे फिजिओ बायझिद अल इस्लाम याने उपचार केले. पण दुखापत जाणवत असल्याने त्याने सरावातून माघार घेतली.
भारताविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार लिटन दास खेळणार की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, लिटन दासची दुखापत किती गंभीर आहे याची तपासणी केली जात आहे. त्याच्या पाठीवर तसं काही दिसत नाही. पण नेमकी दुखापत कशामुळे आणि किती आहे याची माहिती तपासणीनंतरच कळेल. जर लिटन दासची दुखापत गंभीर असेल तर भारताविरूद्धच्या सामन्याला मुकेल. त्याची गैरहजेरी बांगलादेशसाठी मोठा धक्का असेल.
लिटन दासकडे कर्णधार आणि यष्टीरक्षकाची भूमिका आहे. त्यामुळे लिटन दास खेळला नाही तर त्याची जागा भरून काढणं बांगलादेशला डोकेदुखी ठरेल. इतकंच काय तर बांगलादेशचं नेतृत्व कोणाच्या हाती सोपवायचं हा देखील प्रश्न आहे. लिटन दासने आशिया कप स्पर्धेत 29.75 च्या सरासरीने 119 धावा काढल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 129.34 चा आहे.