93203
स्पर्धात्मक युगात अपडेट राहिल्यास यश
अप्पर जिल्हाधिकारी साठे ः सुकळवाड केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः सध्याच्या स्पर्धेच्या युगात जनरल नॉलेज तसेच ध्येय, चिकाटी आणि जिद्द ठेवून विविध राष्ट्रीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेऊन आपले आत्मज्ञान वाढविले पाहिजे. युगपुरुष आणि आपल्या आई-वडील शिक्षकांची प्रेरणा घेऊन पुढे प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.
प्रशासनातरर्फे प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना प्रमुख अधिकाऱ्यांनी भेटी देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर सुकळवाड (ता.मालवण) केंद्रशाळा येथे अप्पर जिल्हाधिकारी साठे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला तसेच शाळेला भेट देऊन शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या जूनमध्ये मी शाळा भेटीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेला भेट दिली होती आणि आज प्रेरणा दिनानिमित्त या शाळेला भेट दिली. शाळेला शासनाकडून आणि लोकांकडून मिळणारे सहकार्य, प्रोत्साहन आणि सामाजिक दृष्टीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती या निमित्ताने घेतली. शाळेचे काम स्तुत्य असून विविध उपक्रमात प्रेरणादायी काम आहे. शैक्षणिक उठाव कार्यक्रमात लोकांनी चांगले सहकार्य केले असून ते सतत सामाजिक दृष्टिकोन ठेवून केल्यास शासनाचा सेवा पंधरवडा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानसारख्या अभियानात सुकळवाड गाव आणि शाळा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही क्रमांक पटकावेल.’’
उपसरपंच किशोर पेडणेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाताडे, मुख्याध्यापक बाळकृष्ण नांदोसकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक नांदोस्कर यांनी शाळेची पटसंख्या, लोकवर्गणीतून घेण्यात येत असलेले उपक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान आहार सद्यस्थिती, शासनाकडून मिळणारे साहित्य, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आणि सेवा पंधरवडा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे दाखले अशा विविध विषयाची माहिती दिली. यावेळी माहिती देताना १०० पटाची शाळा असून शाळेला शासनाकडून विविध उपक्रमासाठी अनुदान देणे आवश्यक आहे. शाळेसाठी गावातील लोकप्रतिनिधी उत्तम सहकार्य करतात, विविध कार्यक्रम घेतात, असे उपसरपंच पेडणेकर यांनी सांगितले. मुख्याध्यापक नांदोस्कर यांनी आभार मानले.
----
अभ्यास कराल तरच अधिकारी व्हाल!
अप्पर जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘आता संगणकीकृत युगात मोबाईलच्या जमान्यात चांगले मार्गदर्शन माहिती मिळत असते. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षांसारख्या परीक्षांतून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या दृष्टीने अपडेट राहा. आपली प्रगती साधण्यासाठी पुढे आले पाहिजे, तरच आपण पुढे वरिष्ठ अधिकारी किंवा विविध क्षेत्रात नाव कमवू शकता. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून प्रगती साधत आहे. आतापासूनच आपण अशा विविध स्पर्धात्मक दृष्टीने ध्येय निश्चित करून चिकाटी आणि सातत्य, जिद्द बाळगून अनेक उपक्रमांची प्रेरणा घेतली पाहिजे. आई-वडील तसेच शिक्षकांनी दिलेले ज्ञान अवगत करून प्रगती साधा.’’