वडापुरी, ता. २२ : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावातील दोन तरूणांची राज्य शासनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अनिल नवनाथ राख यांची ऑगस्ट महिन्यात महापारेषणमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी (वर्ग १) तर भाग्यश्री हरिदास बागल यांची सप्टेंबर महिन्यात राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली. राख हे महापारेषणची खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी बारामती येथे रुजू झाले आहेत. तर बागल यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ मध्ये घेतलेल्या अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षेमध्ये एसईबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये सहावा क्रमांक तर राज्यात १६९ वा क्रमांक पटकावत राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) पदाला गवसणी घातली आहे. लाखेवाडीसारख्या छोट्याशा गावातून दोघांची एकाच वेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त होत आहे.