- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कॅन्सर असो वा इतर गंभीर आजार, उपचारांच्या बाबतीत अनेकदा लोकांच्या मनात द्विधा निर्माण होते. काहींना वाटतं फक्त नैसर्गिक चिकित्सा (Naturopathy) घेऊया, तर काही पूर्णपणे आधुनिक (Allopathy) उपचारांकडे वळतात.
पण खरा मार्ग कोणता? मध्यंतरी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या पत्नीच्या ट्रीटमेंटबाबत सांगितले की, नैसर्गिक उपचारांमुळे लवकर फरक जाणवला. मात्र, त्यांनी आधुनिक उपचार - ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन - घेतलेच होते. त्यामुळे माझ्या मते, कुठल्याही क्षेत्रात असो, नॅचरोपॅथी असो किंवा अलोपॅथी, दोन्ही पद्धतींच्या चांगल्या गोष्टी स्वीकारणे हाच खरा समतोल आहे.
समतोल का आवश्यक?
कॅन्सर ट्रीटमेंटचा केंद्रबिंदू : ऑपरेशन, केमो, रेडिएशन या पद्धती अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या सर्वांत प्रभावी आहेत.
साइड इफेक्ट्स कमी झाले : आजच्या काळातील औषधे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे केमोचे दुष्परिणाम पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहेत.
नैसर्गिक चिकित्सा पूरक ठरते : आहार नियंत्रण, योग, प्राणायाम, ध्यान, म्युझिक थेरपी यामुळे मानसिक शांतता आणि शारीरिक ताकद वाढते. उपाय उपचारांबरोबर घेतल्यास रुग्णाची मानसिक ताकद वाढते.
रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो : केवळ औषधांनी नव्हे तर जीवनशैली सुधारूनही शरीर बळकट होतं, ही जाणीव महत्त्वाची आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन
जागतिक आरोग्य संघटनेचा दृष्टिकोन : या संघटनेने ‘Integrative Medicine’ शब्द वापरून पारंपरिक व आधुनिक वैद्यकाचा संतुलित वापर करण्यावर भर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की योग्य देखरेखीखाली नैसर्गिक उपचार पूरक म्हणून घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसतात.
एम्स, दिल्लीचा अभ्यास : एम्समधीळ अभ्यासानुसार योग व ध्यान यांचा समावेश केलेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये तणाव, चिंता व डिप्रेशन कमी झालं आणि उपचार सहन करण्याची क्षमता वाढली.
टाटा मेमोरियलचा अनुभव : पूरक उपचारांमुळे (योग, आहार, संगीत) रुग्णांचे जीवनमान सुधारले; पण डॉक्टरांनी स्पष्ट केले, की हे मुख्य उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत.
आंतरराष्ट्रीय संशोधन : एमडी अँडर्सन कॅन्सर सेंटरच्या (अमेरिका) अहवालानुसार Integrative Oncology मुळे रुग्णांना अधिक निरोगी जीवनशैली मिळते.
म्हणूनच कोणताही उपचार निवडताना ‘किंवा-तर’ या विचारात अडकू नका. दोन्ही पद्धतींचा समतोल स्वीकारणं, म्हणजेच Holistic Healing, हा आजच्या काळाचा खरा मार्ग आहे. ‘कॅन्सरविरोधी लढ्यात नैसर्गिक चिकित्सा आणि आधुनिक उपचार परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत.’
मानसिक आरोग्याचे महत्त्व
ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार यामुळे तणाव कमी होतो व उपचारांना शरीर चांगला प्रतिसाद देतं.
जीवनशैलीतील बदल : संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप, तंबाखू-मद्यापासून दूर राहणे यामुळे उपचारांची परिणामकारकता वाढते.
समुपदेशन, कुटुंबाचा आधार : औषधोपचारांबरोबरच रुग्णाला मानसिक आधार व सकारात्मक वातावरण मिळणे आवश्यक आहे.
‘वन साईज फिट्स ऑल’ नाही : प्रत्येक रुग्णाचा शरीरप्रकार, जीवनशैली, आजाराचा टप्पा वेगळा असतो.– त्यामुळे कोणती पद्धत कितपत घ्यावी हे वैद्यकीय सल्ल्यानुसार ठरवावे लागते.
रुग्णाच्या सहभागाची गरज : उपचार पद्धती फक्त डॉक्टरांनी ठरवण्यापेक्षा रुग्णाने स्वतः सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला काय सूट होतंय, परिणामकारक वाटतंय हे रुग्णाने ओळखलं पाहिजे.
या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की उपचार पद्धतींपैकी ‘किंवा-तर’ हा पर्याय न निवडता ‘दोन्हीचा समतोल’ हा मार्ग स्वीकारला तरच खरी ‘Holistic Healing’ साध्य होऊ शकते. ‘नैसर्गिक आणि आधुनिक उपचारांचा समतोल हा केवळ आजार बरा करण्यासाठी नाही तर संपूर्ण जीवनशैली बदलण्यासाठी आवश्यक आहे. शरीर, आणि मानसिक स्वास्थ या पातळ्यांवर आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.
कोणतीही ट्रीटमेंट - नैसर्गिक असो किंवा आधुनिक - सुरू करण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. इतर कुणाचं ऐकून किंवा स्वतःहून उपचार सुरू करू नका. प्रत्येक रुग्णाची गरज वेगळी असते, त्यामुळे योग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय उपचार करणे धोकादायक ठरू शकते. योग्य तपासणी आणि संतुलित उपचार यामुळेच उपचार परिणामकारक, सुरक्षित आणि दीर्घकाल टिकणारे ठरते.