नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या वार्तांकनासाठी जाणाऱ्या दूरचित्रवाणीच्या पत्रकारांवर प्रवेश व वाहन शुल्क वसुली करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी हल्ला केला. नाशिक प्रेस क्लब व नाशिक शहर पत्रकार संघाने सोमवारी (ता. २२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत दोषींवर कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करताना त्र्यंबकेश्वरमधील प्रवेश व वाहन शुल्क रद्द करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविताना दोषींवर कारवाईची ग्वाही दिली.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात त्र्यंबकेश्वर पालिकेचे प्रवेश शुल्क वसुलीचे कंत्राट सुमारे १.०८ कोटी रुपयांचे आहे. मुंबईस्थित व्यक्तीला ते देण्यात आले. सदर कंत्राटदाराने दोन उपकंत्राटदार नियुक्त केले. वसुलीसाठी त्यांनी गुन्हेगारांचा वापर केला. ही बाब लक्षात घेत पालिकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची यासंदर्भात चौकशी करावी.
त्यात घोटाळा झाल्याचा संशय असून, तसे असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. तसेच, आगामी सिंहस्थात भाविकांना लक्ष्य करून अनेक समाजविघातक आणि संशयास्पद चारित्र्य असलेली मंडळीही लूट करण्यासाठी येऊ शकतात. हे विचारात घेत नाशिकमधील टोल, पार्किंग, स्वच्छतेच्या ठेक्यांसाठी नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करावी. कंत्राटदारासाठी हा नियम लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
या वेळी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सल्लागार संपादक जयप्रकाश पवार (दिव्य मराठी), सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे (देशदूत), संपादक अभिजित कुलकर्णी (लोकमत), संपादक किरण लोखंडे (पुण्यनगरी), संपादक राहुल रनाळकर (पुढारी), निवासी संपादक दीप्ती राऊत (दिव्य मराठी), नाशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे, टीव्ही-९ चे ब्यूरो चीफ चंदन पुजाधिकारी यांच्यासह विविध दैनिकांचे वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
यंत्रणांना सूचना करणार : जलज शर्मा
त्र्यंबकेश्वरमधील घटना अयोग्य आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा व पत्रकारांची एकत्रित कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. कार्यशाळेत पत्रकारांचे हक्क व अधिकारांबाबत यंत्रणांना अवगत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘राष्ट्रवादी’तर्फे निषेध
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील वाहनतळांचे ठेके रद्द करुन ते बचतगटांना द्यावे, अशी मागणी केली गेली. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, हर्षल चव्हाण, डॉ. संदीप चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हल्ल्याची चौकशी करावी : शिवसेना (उबाठा)
त्र्यंबकेश्वरमधील हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे. पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कुंभमेळा समितीत साधू-महंतांचा समावेश करताना जिल्ह्याला पालकमंत्री नेमावा. कुंभमेळा निधीचा लेखाजोखा जाहीर करावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या वेळी खासदार राजाभाऊ वाजे, पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मसुद जिलानी, सागर कोकणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पत्रकार संघांतर्फे निवेदन
जिल्हा मराठी पत्रकार संघ व नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कारवाई करावी. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने उपाययोजना कराव्यात. अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण राबवावे. पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह विविध पत्रकार उपस्थित होते.
Marathwada Rain : दुष्काळी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय, शेतकरी राजा संकटात; सरकारने तातडीनं मदत करावी : शरद पवारबैठकीतील मुद्दे
त्र्यंबकेश्वरमध्ये शासकीय वाहनतळांबाबत फलक लावणार
दर्शनबारीत ऑनलाइन पद्धतीने दर्शनासाठी यंत्रणा निर्माण करणार
पत्रकारांना सुरक्षा पासेस व अन्य सुविधांसाठी प्रणाली विकसित करणार
घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना अवगत केले जाईल