पिंपळगाव बसवंत: परतीच्या धुवाधार पावसामुळे इतर जिल्ह्यांतील टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त झाले असून, तेथील बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील टोमॅटोच्या बाजारभावावर झाला आहे. शंभर रुपये प्रतिक्रेट अशा गडगडलेल्या टोमॅटोच्या दरात सोमवारी (ता. २२) चांगलीच तेजी आली. चारशे रुपये प्रतिक्रेट (२० किलो) असे टोमॅटोचे दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे.
राज्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सोलापूर, संगमनेर, नारायणगाव येथील टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचून हजारो एकर टोमॅटोचे पीक सडून जमीनदोस्त झाले. नारायणगाव येथील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. बेंगळुरू-कोल्हार येथेही टोमॅटोचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी राज्यांची टोमॅटोची मागणी पुरविण्याची भिस्त नाशिक जिल्ह्यावर येऊन ठेपली आहे.
दहा दिवसांनंतर आली तेजी
बंपर आवक सुरू असल्याने गेल्या दहा दिवसांपासून मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने टोमॅटोच्या दरात जोरदार घसरगुंडी झाली होती. पाचशे रुपयांचे दर शंभर रुपये प्रतिक्रेटपर्यंत गडगडले. प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटोचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता. अखेर दहा दिवसांनंतर टोमॅटोच्या दरात पुन्हा तेजी परतली आहे.
इतर जिल्ह्यांत टोमॅटोची आवक घटल्याने तेथील व्यापारी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीसाठी आले आहेत. परराज्यातील टोमॅटोची मागणी पुरविण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे सौदे करताना मोठी चढाओढ दिसली. त्यातून दरामध्ये तीन रुपयांची वाढ होऊन प्रतिक्रेट सरासरी चारशे रुपये दराने खरेदी झाली. तब्बल दीड लाख क्रेट टोमॅटोची सोमवारी बाजार समितीत आवक झाली.
Buldhana Flood: मोताळा तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाचा थैमान; शेतजमिनी व शेतीपिकांचे अतोनात नुकसानपरतीच्या पावसाने सोलापूर, नारायणगाव परिसरातील टोमॅटोच्या पिकाची हानी झाली आहे. बेंगळुरूचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.
-सुभाष होळकर, अमर व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत