Shirdi Saibaba Temple : शिर्डी साई मंदिर प्रमुखावर भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन
Saam TV September 24, 2025 04:45 PM
  • शिर्डी साई मंदिर प्रमुखावर भेट स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे.

  • कोणत्या स्वरूपाची भेटवस्तू स्वीकारली हे अद्यापही अस्पष्ट

  • सीसीटीव्ही फूटेज जतन करून ठेवले असल्याचे संस्थानचे आश्वासन

शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख भाविकांकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. साई संस्थानने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे.

साई संस्थान किंवा कर्मचाऱ्यांना भाविकांडून भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई आहे. मात्र २७ ऑगस्ट रोजी मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांच्या कार्यालयात महिला साईभक्ताकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे. ती भेटवस्तू आर्थिक स्वरूपात होती की आणखी काय? हे स्पष्ट होत नसल्याने साई संस्थानने त्या दिवसाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आणावे किंवा न्यायालयीन प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावे अशा आशयाचे पत्र काळे यांनी साई संस्थानला दिलं आहे.

Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

मात्र २० दिवस उलटूनही साई संस्थानकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संजय काळे यांनी साई मंदिर परिसरातील द्वारकामाई मंदिरासमोर एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्याविरोधात न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे काळे यांनी म्हटलं आहे.

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

दरम्यान साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देत काळे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हंटले आहे.. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि मंदिर प्रमुखांचा जबाब घेतल्यानंतर महिला भाविकाने मंदिर प्रमुखांना अत्तरची बाटली दिल्याचे समोर आलं आहे. काळे यांच्या मागणीनुसार त्या दिवसाचे सीसीटीव्ही फूटेज आम्ही जतन करुन ठेवले असून गरज पडल्यास ते न्यायालयात सादर करू. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भाविकांकडून परस्पर कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नये अशा सूचना देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.