कोरेगाव: वीटभट्टीवर सहा जोड्या (१२ कामगार) देतो, असे सांगून तीन लाख रुपये स्वीकारून एकही कामगार न पुरवता खोट्या सहीचे धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील एकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सोमनाथ दादासाहेब यादव (वय ४५, रा. भाटमवाडी, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की ओमटे (जि. रायगड) येथील राजू दत्तात्रय जाधव याने मला वीटभट्टीच्या कामाकरिता सहा जोड्या (१२ मजूर) पुरवतो, असे सांगून माझा विश्वास संपादन करून मजूर पुरवण्याच्या बदल्यात माझ्याकडून एकूण तीन लाख रुपये फोन पे व रोख रकमेच्या स्वरूपात स्वीकारून घेतले.
परंतु अद्यापपर्यंत वीटभट्टीच्या कामाकरिता मला एकही मजूर न पुरवता माझ्याकडून घेतलेले पैसे मला परत न करता मला खोट्या सहीचे धनादेश देऊन माझी फसवणूक केली आहे. म्हणून माझी राजू जाधव याचेविरुद्ध तक्रार आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भेगडे करत आहेत.