Thane Traffic: बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन! ठाणे-भाईंदर मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी
esakal October 14, 2025 05:45 AM

ठाणे शहर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील गायमुख घाटमाथ्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रविवारी (ता. १२) नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. याकरिता वाहतूक विभागाने शनिवारी (ता. ११) रात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली; मात्र पालघर, चिंचोटी आणि कापूरबावडी नाक्यावर या आदेशाचे पालन केले गेले नाही. न्हावा-शेवा बंदर आणि पालघर, वसई, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्याने प्रचंड कोंडी झाली. त्यातच रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे-घोडबंदर वाहिनीवर उलटल्याने कोंडीमध्ये भर पडली.

घोडबंदर घाट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना शनिवारी (ता. ११) रात्री १० वाजल्यापासून मंगळवारी (ता. १४) रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीला बंदी घातली; मात्र कापूरबावडी, चारोटी, पालघर वाहतूक विभागांकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली. परिणामी, या मार्गावर दोन्ही नाक्यांवरून अवजड वाहनांना अडवण्यात आले नाही. त्यामुळे रात्रभर या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिली. रविवारी दुपारपर्यंतही या वाहनांना वाहतूक विभागाकडून अडवण्यात आले नाही. त्यामुळे इतर लहान आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कोंडीत अडकावे लागले.

Thane News: एकनाथ शिंदे यांच्या होमपीचवर मनसे-ठाकरे गटाचे आंदोलन; ठाण्यातील कोंडी, भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा रोटेशन पद्धतीचा वापर

मिरा-भाईंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या रस्त्यावर दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक २० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूकडील वाहने रोटेशन पद्धतीने सोडली जात होती. गायमुख घाट चढणीला खड्डे पडले आहेत. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने घाटावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

२० मिनिटांचा प्रवास तब्बल चार तासांवर

पालघर, चिंचोटी नाक्यांवर गुजरात, वसईकडून येणारी अवजड वाहने न अडवल्याने ही वाहने ठाणे-घोडबंदर मार्गावर दिसत होती. ठाण्याहून वर्सोवा नाका या १५-२० मिनिटांच्या प्रवासासाठी कोंडीमुळे तब्बल तीन ते चार तासांचा अवधी लागत होता.

अपघातामुळे कोंडीमध्ये भर

घोडबंदर मार्गावरील हनुमान मंदिर परिसर आणि मुंबई-नाशिक महामार्गावर आरडी ढाबा परिसरात ट्रक उलटून अपघात झाले. दोन्ही ठिकाणी उलटलेले ट्रक बाजूला काढण्यास वेळ लागल्याने कोंडीतभर पडली होती.

Navi Mumbai News: खारघरचे पाणी तळोज्याला! सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे रहिवासी हैराण

अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी त्यांना एकदम बंदी घातली तर मोठी समस्या उभी राहू शकते. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येत आहे. थोड्या थोड्या अंतराने अवजड वाहनांनाही प्रवेश दिला जातो; मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर खानिवडे नाका येथे अवजड वाहनांना पूर्ण बंदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक संघटना, पालघर पोलिस यांच्याशी चर्चा केली आहे.

- अशोक विरकर, उपायुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.