Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात
esakal October 14, 2025 05:45 AM

नवी मुंबई : दिवाळी सणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठा, मॉल्स तसेच वर्दळीच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. या काळात पाकीटमारी, साखळी चोरी अशा गुह्यांमध्ये वाढ होत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबतही सुचित केले आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेविषयक विविध उपाययोजना केल्या आहेत. सोनसाखळी चोरी, छेडछाड आणि ईव्ह-टीझिंग सारख्या गुह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठा, बँका, एटीएम सेंटर तसेच सोसायट्यांमध्ये वाढीव पोलीस गस्त ठेवण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस नियुक्त केले आहेत. तर महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक, बीट मार्शल्स तैनात करण्यात आली असून प्रत्येक विभागात रात्रीच्या गस्तीसाठी स्वतंत्र पथके असणार आहेत.

Navi Mumbai News: खारघरचे पाणी तळोज्याला! सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे रहिवासी हैराण सीसीटीव्ही, तांत्रिक नियंत्रण

दिवाळीच्या काळात बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कोंडी होते. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. वाहतूक नियोजनासाठी महिला पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने सीसीटीव्ही नेटवर्कद्वारे प्रमुख चौक, बस, रेल्वे स्थानके आणि गर्दीची ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

आकाशात कंदील, ड्रोनवर बंदी

आकाशात उडणाऱ्या कंदिलांमुळे आगीचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. तसेच समाजकंटकांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलिसांनी आकाशात कंदील उडवण्यावर तसेच त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याचबरोबर ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणासाठी आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे.

जगातील सर्वात जुना ध्वज कोणता? सायबर गुन्हेगारांवर विशेष लक्ष

दिवाळीच्या खरेदीदरम्यान ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरीकांनी खोट्या ऑफर्स, ऑनलाइन गिफ्ट कूपन्स, बँक अपडेटचे फसवे कॉल्स किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२, वाहतूक हेल्पलाइनसाठी ७७३८३९३८३९, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइनसाठी १०९० आणि महिला हेल्पलाइनसाठी १०३ असे विविध क्रमांक उपलब्ध केले आहेत.

दिवाळीच्या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दागिने किंवा रोख रक्कम बाहेर घेऊन जाणे टाळावे. बाहेरगावी जाताना, दरवाजे आणि खिडक्या नीट बंद ठेवाव्यात. तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास पोलिसांना कळवावे.

- योगेश गावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, विशेष शाखा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.