मद्यपी वाहनचालकाचा वाहतूक पोलिसावर हल्ला
esakal October 14, 2025 03:45 PM

कुरुळी, ता.१३ : महाळुंगे एमआयडीसी परिसरात दारूच्या नशेत वाहनचालकाने वाहतूक पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला आहे. अपघातानंतर झालेल्या वादातून आरोपीने सरकारी कार्यालयात शिरून पोलिसावर हात उगारला तसेच कार्यालयातील वस्तूंचेही नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार दादासाहेब पांडुरंग गायकवाड (वय ४२) यांनी तक्रार दिली असून आरोपी गणेश जयवंत कवडे (वय ४६, रा. वीर सावरकर नगर, जेल रोड, नाशिक) यास अटक करण्यात आली आहे. हा प्रकार चाकण वाहतूक विभागाच्या हद्दीतील कुरुळी गावाजवळील स्पायसर चौक परिसरात घडला असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी गणेश कवडे हे मद्यधुंद अवस्थेत मोटारी(एमएच १५ जीआर ३०४९)तून स्पायसर चौकातून मोशीकडे जात असताना त्यांनी दुसऱ्या कारला धडक दिली. अपघातानंतर त्यांनी उलटच पीडित चालकाकडे पैशांची मागणी करत वाद घातला. यानंतर ते वाहतूक विभागाच्या ठाणे अंमलदार कार्यालयात शिरले आणि तेथे शासकीय कामात व्यत्यय आणत हवालदार गायकवाड यांना चापट मारली, गणवेश फाडला तसेच कार्यालयातील मोबाइल, लॅपटॉप, प्रिंटर आदी वस्तू फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.