मासेमारीसाठी बोटी झेपावल्या
प्रदीर्घ विश्रांतीनंतर नव्या हंगामाला सुरूवात
मुरुड, ता. १३ (बातमीदार)ः मत्स्य विभागाने १ ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी दिली होती, मात्र समुद्रात घोंगावणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे, पण वादळ शांत झाल्याने दर्याचा राजा नव्या उत्साहात बोटींवर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुरूड तालुक्यातील मुरूड तालुक्यासह शहरातील हजारो कुटुंबांचा मासेमारीवर उदरनिर्वाह होतो. मुरूड तालुक्यात एकदरा, राजपुरी, आगरदांडा, मजगाव, बोर्ली, कोर्लेई गावातील ६५० लहान मोठ्या बोटींनी समुद्राकडे कूच केली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा दर्याकडे झेपावताना महिनाभर पुरेल इतके रेशन, पाणी, बर्फ, पुरेशी औषध, इंधन भरण्यासाठीची कोळी बांधवांची लगबग सुरू होती.
------------------------------
मच्छीमारांना अनुदान द्या’
चार महिने मासेमारी बंद असल्याने नाखवा अर्थात बोट मालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने मासेमारी बंद काळात मच्छीमारांना अशतः अनुदान द्यायला हवे, असे मत रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी व्यक्त केले.