ढिंग टांग : भोजनादेश ते जनादेश..!
esakal October 14, 2025 04:45 PM

दादू : (तृप्त मनाने फोन फिरवत) म्यांव म्यांव म्यांव म्यांव..!

सदू : (पेंगुळलेल्या आवाजात) होऊऽऽब्ब्वा..!!

दादू : (चमकून) हा कसला आवाज?

सदू : (खुलासा करत) ढेकर रे दादूराया, ढेकर…! पोट तुडुंब भरलंय!!

दादू : (डोळे मिटून समाधानाने) तू आलास, तू जेवलास आणि तू जिंकलंस!! कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू?

सदू : (मिटक्या मारत) काय बेत केला होतास, दादूराया! तोहडा जबाब नहीं!

दादू : (खुशीत) तरी मला चांगलासा हलवा मिळाला नाही! नाहीतर आणखी धमाल आली असती! कोळंबीचं तिखलं खाल्लंस की नाही? आणि सोड्याची खिचडी?

सदू : (पोटावर हात फिरवत) होऊऽब्ब्वा..!! म्हंजे हो!! एकशे साठ मिनिटं आपण एकत्र होतो, त्यातली एकशेवीस मिनिटं नुसते जेवलो!! काय हे?

दादू : (प्रेमभराने) इतक्या वर्षांनी माझ्या घरी तुमची उष्टी सांडली! मला खूप बरं वाटलं!!

सदू : (खंतावून) शेवटचे सात गुलाबजाम मी संपवू शकलो नाही, याची चुटपूट लागून राहिली आहे!!

दादू : (दिलखुलासपणे) पुढच्या वेळी चौदा खा!!

सदू : (खुदकन हसत) आपण तिथं एकशेसाठ मिनिटं एकत्र होतो, आणि इथं एकशेसाठ लोकांच्या पोटात एकशेसाठ खड्डे पडले होते! हाहा!!

दादू : (गोंधळून) मी समजलो नाही!!

सदू : (खुलासा करत) महायुतीवाले रे!! लेकाचे गमज्या मारतात ना, आमचं ट्रिपल इंजिन वगैरे! आता घ्या म्हणावं, आमचं डब्बल इंजिन अंगावर!! मला सारखे फोन करतायत की, तुम्हीही महाविकास आघाडीत सामील होणार का?

दादू : (खिदळत) ये हुई ना बात!! मग तू काय उत्तर दिलंस?

सदू : (चतुराईनं) मी नुसतंच ‘हलो हलो…ऐकू येत नाही, काय शिंचं हे नेटवर्क’ वगैरे बोलत राहिलो!! हाहाहाहा!!

दादू : (किंचित हिरमुसून) एकदा सांगूनच टाक ना त्यांना की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आणि…आणि…

सदू : (वाक्य पूर्ण करत) एकत्र जेवण्यासाठी!!

दादू : (हताशेनं) सदूराया, आपण गेल्या दोन महिन्यात सात वेळा एकमेकांना भेटलो!! सेव्हन!!

सदू : (बोटं मोडत) रविवारचं जेवण धरुन सात! करेक्ट!!

दादू : (स्वप्न दाखवत) एकदा संडे स्पेशल जेवलो, तर आपल्या विरोधकांना मुरडा आला!! रोज जेवलो तर काय होईल, याचा विचार कर!!

सदू : (काहीही कारण नसताना भंपक कोटी करत) तुमचा हंबरडा, त्यांचा मुरडा!! हाहा!! आम्हालाही शाब्दिक कोट्या करता येतात म्हटलं!!

दादू : (कसनुसं हसत) लहानपणापासून तू हुशारच आहेस तसा!!

सदू : (अचानक आठवून) बाय द वे, विसरण्यापूर्वी सांगतो, अळुवडी अफलातून होती हं!!

दादू : (अधीर होत) बरं बरं! पण आपल्या मनोमीलनाच्या अळुवडीचं काय करायचं, हे सांग की एकदा!!

सदू : (बेफिकिरीने) ठरवू रे! एवढी कसली घाई आहे? अजून निवडणुकीच्या तारखासुद्धा जाहीर झाल्या नाहीत!!

दादू : (आग्रह करत) आपले कार्यकर्ते वडापाववर दिवस काढताहेत, आणि आपण लागोपाठ जेवतोय, हे बरं दिसतं का? लौकर जाहीर करुन टाक की!!

सदू : (पोटावर हात फिरवत) होऊऽऽब्ब्वा!!

दादू : (गोंधळून) म्हणजे ‘हो’ असंच ना?

सदू : (शांतपणाने) नाही, मी नुसता ढेकर दिला!! जेवण जड झालंय, अजून उतरलं नाही!!

दादू : (थोरल्या भावाच्या आवाजात) सदूराया, ऐक! आता मुंबईकरांच्या जनादेशाचा घास घेतल्याशिवाय तृप्तीचा ढेकर द्यायचा नाही! कळलं? जय महाराष्ट्र.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.