लोकप्रिय मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीमधे स्वतःचं स्थान निर्माण केलंय. ती मराठीसोबतच हिंदीमध्येही झळकली आहे. ती ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती अनेकदा तिचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसते. आताही एका मुलाखतीत गिरिजाने प्रत्येक आईने वाचावा असा सल्ला दिला आहे. आपण अनेकदा स्वतः उपाशी राहून मुलांना आधी भरवतो, मात्र त्यामुळे नक्की काय होतं याबद्दल तिने सांगितलंय. सोबतच तिच्या सासूबाईंनी तिला याबद्दल मोलाचा सल्ला दिलेलाही तिने सांगितलाय.
नुकतीच गिरिजाने लल्लनटॉपला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'लहान मुलांना जेवण भरवणं हा एक कार्यक्रम असतो. चिऊताईचा घास असतो, कधी विमानातून उडून घास येतो. एकूणच लहान मुलांना जेवण भरवणं हा एक तासभर चालणारा कार्यक्रम असतो. जर तुम्ही स्वतः उपाशी आहात आणि तुम्हाला लहान मुलांना जेवण भरवायचं असेल तर पटकन राग येऊ शकतो. शेवटपर्यंत पारा चढलेला असतो. मी सुद्धा अशावेळी ४० मिनिटापर्यंत ठीक असायची पण नंतर मात्र 'खा रे, आता!!' असं होतं. कारण तो जेवल्यानंतरच मी जेवणार. तो बिचारा उपाशी आहे तर मी कसं खाणार, आई कशी जेवेल असा विचार यायचा.'
ती पुढे म्हणाली, 'एकदा माझी सासू आली तेव्हा तिने मला सांगितलं याची काही गरज नाही. आधी तू जेवून घे, मग त्याला जेवण भरव. लहान बाळाला तसंही खाण्यात इंटरेस्ट नाही. त्याला खेळायचं असतं. त्याला ४ मिनिटं उशीरा जेवण भरवलं तर काहीही फरक पडणार नाही. पण तुझी अवस्था बघ काय झालीये, त्यामुळे तू आधी जेवून घे, असं सासूबाई म्हणायच्या. त्यानंतर मी आधी जेवून घ्यायची. मी आणि सासूबाईंनी या गोष्टीला एक कोडवर्ड दिला. लहान मुलांची मदत करण्यासाठी आधी तुम्ही सक्षम व्हा त्यानंतर मुलांची मदत करा.'
अय्यो! एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी चूक? 'कांतारा चॅप्टर १' मध्ये ती गोष्ट पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात