98278
‘आडाळी’त दुसऱ्या प्रकल्पाला थारा नाही
ग्रामस्थांचा इशारा; भूखंड वाटप बंद केल्याने संशय
सकाळ वृत्तसेवा,
दोडामार्ग, ता. १२ ः आडाळी एमआयडीसी भूखंड वाटप प्रक्रिया बंद आकारण्यात आली. मात्र, कोणत्या कारणासाठी स्थगिती लावली, याचे लेखी उत्तर अधिकारी देत नसल्याने संभ्रमावस्था आहे. ज्या उद्योजकांनी भूखंड ताब्यात घेतले आहेत त्यांच्या प्रस्तावातही त्रुटी काढून अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. एमआयडीसीची जागा अन्य प्रकल्पांकडे वळविली जात असल्याचा आरोप मोरगाव येथे राजकीय, सामाजिक, उद्योजक, ग्रामस्थांच्या सभेत करण्यात आला. या जागेत दुसऱ्या कोणत्याही प्रकल्पाला थारा देणार नसल्याचा इशारा उपस्थितांनी दिला आहे.
स्थानिकांनी वडिलोपार्जित जमिनी एमआयडीसीला दिल्या, कारण आपल्या स्थानिक युवकांना रोगजगार उपलब्ध होईल, आपल्या भागाचा विकास होईल. त्यासाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनींचा त्याग केला. त्यानंतर स्थानिकांनी पुढाकार घेऊन आडाळी एमआडीसी कृती समिती स्थापन केली आणि त्या कृती समितीच्या मार्फत या जागेत उद्योग यावेत म्हणून गेली अनेक वर्षे संघर्ष चालू आहे. काही ठिकाणी अशा प्रकल्पांना स्थानिक लोक विरोध करतात तर या उलट आडाळी येथे उद्योग यावेत म्हणून स्थानिक लोक संघर्ष करीत आहेत. एमआयडीसीतील पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित भूखंड वाटप व ज्यांना भूखंड देण्यात आले आहेत त्यांच्या पुढील प्रक्रिया बंद करण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार या सभेदरम्यान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. ते म्हणाले, ‘आजच्या घडीला ५४ उद्योजकांनी भूखंड ताब्यात घेतले आहेत. मात्र, उद्योगांना सुरुवात करण्यासाठी जी प्रक्रिया केली पाहिजे त्या प्रक्रियेमध्ये अधिकारी नाहक त्रुटी काढीत आहेत. हा सर्व प्रकार पाहता आडाळी एमआयडीसीच्या जागेत अन्य दुसऱ्या प्रकल्पांना आणण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप कृती समितीने केला. मात्र, उपस्थितांनी या जागेत अन्य कोणत्याही प्रकल्पाला थारा दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांना गोल्फ किंवा रिअल इस्टेट यासाठी येथील जमिनी देणार का? अशी विचारणा केली असता त्यांनी माझ्या पातळीवरील या गोष्ट नसल्याने मला त्याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी, दोडामार्गचे माजी नगरध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये, कळणे सरपंच अजित देसाई, पत्रकार समिती अध्यक्ष रत्नदीप गवस, मोरगाव सरपंच आईर, हेल्पलाइन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार, आडाळी सरपंच पराग गावकर, घुंगुरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यासह ग्रामस्थ व उद्योजक आदी उपस्थित होते.
श्री. नाडकर्णी म्हणाले, ‘‘इथल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न आहे. या ठिकाणी रोजगार यावा अशी राजकीय नेत्यांची मानसिकता नाही. म्हणूनच गेली काही वर्षे एमआयडीसीचे काम रखडले होते. स्थानिक कृती समितीने आंदोलने, उपोषण केल्यानंतर दिशा मिळाली. मात्र, आता जी राजकीय हस्तींची व अधिकाऱ्यांच्या हालचाली पाहिल्या तर त्याला वेगळा वास येत आहे. त्यामुळे दशक्रोशीतील युवकानं एकत्रित आणून कमिटी स्थापन करूया. दुसरा प्रकल्प आणल्यास त्या विरोधात आंदोलन उभारूया. स्वतः त्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करेन.’’
भीमसेन देसाई म्हणाले, ‘‘सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. ५२ हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र, अद्याप परवानगी मिळाली नाही. माझा उद्योग सुरू झाल्यास ६० लोकांना रोजगार मिळू शकतो. मात्र, परवानगी नाकारण्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जात नाही. एका कंपनीच्या प्रतिनिधींनीही यावेळी एमआयडीसीच्या कारभारावर खंत व्यक्त केली. भूखंड मिळाल्यानंतर येथे दिड ते दोन लाख रुपये केवळ कागदपत्रांवरच खर्च केला. अद्याप वीज किंवा पाण्याचे कनेक्शनच दिले गेले नाही. तरी ऑनलाईन बिल टाका, असे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात असे ते म्हणाले.
.................
कोट
आडाळी एमआयडीसी ही संपूर्ण तालुक्यातील लोकांसाठी महत्त्वाची आहे. याठिकाणी उद्योग आलेत तर आपल्या युवकांच्या हाताला रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. राजकीय व्यक्ती आश्वासने देऊन आपल्याच लोकांची फसवणूक करीत आहेत. यापुढे एमआयडीसी विषयात राजकीय पुढारी म्हणून न वावरता स्थानिक म्हणून उभे राहणार आहोत. तसेच याठिकाणी उद्योग आणण्यासाठी कोणतेही पाऊल उचला, तालुक्यातील सरपंच सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार.
- अनिल शेटकर, तालुकाध्यक्ष, सरपंच संघटना
............
उद्योग व्यवसाय बाजूला ठेऊन एमआयडीसी जागेत पर्यटन विकास करायचा मानस आहे असे ऐकिवात येत आहे. त्या ठिकाणी उद्योगच यायला पाहिजेत. उद्योग डावलण्याचा प्रयत्न करत असतील तर संपूर्ण तालुका पेटून उठला पाहिजे. आणि, ते काम आम्ही करणारच आहोत. हेल्पलाईन ग्रुपच्या माध्यमातून देखील आंदोलन उभारणार आहोत.
- वैभव इनामदार, तालुकाध्यक्ष, हेल्पलाईन ग्रुप
............
आडाळी संपादित क्षेत्र जुळत नाही. याबाबत स्थानिकांशी चर्चा केली आहे. त्या सर्व क्षेत्राचा सातबारावर नोंद घालण्यासाठी तलाठ्यांना पाठविले आहे. मात्र, गेले पंधरा दिवस झाले नोंद घातली नाही. तसेच मोजणी प्रक्रियेलाही जिल्हाधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे. क्षेत्राची मोजणी व्यवस्थित न झाल्यामुळे प्लॉटिंग करण्यास अडचणी येत आहे. स्थानिकांनाही याबाबत सांगितले असून एक ते दीड महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ववत सुरू होईल.
- वंदना खरमाळे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी