टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं (India Tour Of Australia 2025) काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत 3 तर टी 20i मालिकेत एकूण 5 टी 20i सामने होणार आहे. एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांना पाहायला मिळणार असल्याने उत्साह आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याने प्रतिक्रिया दिली आहे.
पॅटने रोहित आणि विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा उल्लेख करत त्यांच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच पॅटने निराशाही व्यक्त केली. रोहित आणि विराट हे दोघेही गेल्या 15 वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहेत. या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पाहायची संधी मिळेल. क्रिकेट चाहत्यांसाठी या दोघांना ऑस्ट्रेलियात पाहण्याची शेवटची संधी असू शकते, असं पॅटने म्हटलं.
पॅट या मालिकेत खेळता येणार नसल्याने निराश आहे. “टीम इंडिया विरूद्धच्या वनडे आणि टी 20i मालिकेला मुकणं ही लाजिरवाणी बाब आहे. या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल. ऑस्ट्रेलियात आधीपासूनच उत्साह आहे”, असं पॅटने म्हटलं.
“त्यामुळे जेव्हा तुम्हाला सामन्याला मुकावं लागतं तेव्हा हे निराशाजनक असतं. अशा मोठ्या मालिकेतून बाहेर असणं अवघड असतं”, अशा शब्दात पॅटने आपण टीम इंडिया विरुद्ध खेळू शकणार नसल्याची खंत व्यक्त केली. पॅटला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्ध खेळता येणार नाहीय.
पॅटला दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याने मिचेल मार्श वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. पॅटने या निमित्ताने मिचेल मार्श याला सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे सीरिज जिंकायली हवी. मात्र त्या युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी जे वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले नव्हते.
“त्यांना आपल्यासह खेळायची संधी द्याला हवी हे आपलं लक्ष्य आहे. ते कशी कामगिरी करतात हे पाहायला हवं. या खेळाडूंना संधी देऊन आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत कोणते 15 जण खेळणार याची चाचपणी करायला हवी”, असंही पॅटने म्हटलं.