रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे दोघेही यापुढे फक्त वनडे सामने खेळताना दिसतील. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची असणार आहे. त्यांचा फॉर्म आणि फिटनेस याचं आकलन केलं जाणार आहे. त्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. असं असातना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. भारत ऑस्ट्रेलियाची एक प्लेइंग 11 निवडली आहे. या संघात पॅट कमिन्सने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना स्थान दिलं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच काय तर या संघातून जसप्रीत बुमराहालाही डावललं आहे. एडम गिलख्रिस्ट याचाही विचार केला नाही.
पॅट कमिन्सने स्टार स्पोर्ट्सवर सर्वकालीन भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील संयुक्त प्लेइंग 11 जाहीर केली आहे. यात 8 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. तर फक्त 3 भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. ते देखील निवृत्त असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे. पॅट कमिन्सने सलामीसाठी डेविड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर यांची निवड केली आहे. त्यानंतर मधल्या फळीत रिकी पॉन्टिंग, स्टीव्ह स्मिथ, शेन वॉटसन आणि मायकल बेवन यांना संधी दिली आहे. तर भारताकडून जहीर खान आणि महेंद्रसिंह धोनीला प्लेइंग 11 मध्ये घेतलं आहे. तर शेन वॉर्न, ब्रेट ली आणि ग्लेन मॅक्ग्राना यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं आहे.
पॅट कमिन्सने भारत ऑस्ट्रेलियाची निवडलेली संयुक्त प्लेइंग 11 : डेविड वॉर्नर, सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, स्टीव स्मिथ, शेन वॉटसन, माइकल बेवन, एमएस धोनी, शेन वॉर्न, ब्रेट ली, ज़हीर खान, ग्लेन मॅकग्रा.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना कोण जिंकणार? याकडे लक्ष लागून आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकून मालिकेवर पकड मिळवण्याचा हेतू असणार आहे. पहिला वनडे सामना गमवणाऱ्या संघावर उर्वरित दोन्ही सामन्यात दडपण सहन करावं लागणार आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न होणार आहेत.