टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 20 पैकी 19 संघ ठरले, आता एका स्थानासाठी तीन टीम शर्यतीत
Tv9 Marathi October 16, 2025 07:45 AM

टी20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी होत असतो. आता फेब्रुवारी 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्यापैकी 19 संघांची नावं निश्चित झाली आहेत. नेपाळ आणि ओमानने आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आता टी20 वर्ल्डकपमधील भाग घेणाऱ्या 20 पैकी 19 संघ ठरले आहेत. आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीत नेपाळ संघाने सुपर सिक्स फेरीत तीन सामने खेळले आणि तिन्ही सामने जिंकून स्थान पक्कं केलं. यापूर्वी नेपाळने 2024 च्या टी20 वर्ल्डकपमध्येही स्थान निश्चित केले होते. 2014 आणि 2024 नंतर नेपाळने या स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा जागा मिळवली. नेपाळने अलिकडेच तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव करून क्रीडाप्रेमींना धक्का दिला होता. दुसरीकडे ओमानने सुपर सिक्समधील त्यांचे तिन्ही सामने जिंकून आणि अव्वल स्थान पटकावलं. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आपले स्थान निश्चित करण्यात यश मिळवले आहे. ओमानने चौथ्यांदा टी20 वर्ल्डकपमध्ये जागा मिळवली आहे. यापूर्वी ओमानने 2016, 2021 आणि 2024 च्या विश्वचषकातही खेळले

आता एका जागेसाठी जोरदार चुरस असणार आहे. या जागेसाठी तीन संघ शर्यतीत आहेत. युएई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण 2026 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्यांचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही.आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरी पाहता युएई, जापान आणि कतार यांच्याकडे संधी आहे. कारण पॉइंट टेबलमध्ये सुपर सिक्स स्थान मिळवण्याची या तीन संघाकडे संधी आहे. शेवटचे सामने सर्व संघांसाठी महत्त्वाचे ठरतील. जापानला अजून दोन सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर पात्र ठरतील. खासकरून जापानविरुद्धचा विजय युएईला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट देणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दुसरीकडे, इटलीने 2026 च्या टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीत उलथापालथ करत पहिल्यांदा जागा मिळवली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरलेले 19 संघ: भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ आणि ओमान

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.