Maoist Couple Gadchiroli: भूपती'ने लावलं लग्न, पोलिसांनी दिलं नवजीवन माओवादी जोडप्याची नवसंविधानिक कहाणी
esakal October 17, 2025 12:45 AM

गडचिरोली : न कळत्या वयात म्हणजे अवघ्या ११ व्या, १२ व्या वर्षी माओवादी चळवळीत त्यांचा प्रवेश झाला. तारुण्यात त्यांचे एकमेकांवर प्रेम बसले. दीर्घ कार्यकाळानंतर बुधवार (ता. १५) शरणागती पत्करलेला जहाल माओवादी भूपती याने त्यांचे लग्न लावून दिले. पण त्या शरणागतीच्या एक वर्षापूर्वीच पोलिसांना शरण आलेल्या या दाम्पत्याने माओवादावर फुली मारत आता संविधानच सर्वोपरी असल्याचा विश्वास बुधवारच्या सोहळ्यात व्यक्त केला.

असीन राजाराम व जनिता जाडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. असीन हरियाणाचा रहिवासी असून वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी, तर गडचिरोलीची जनिता जाडे अवघ्या ११ व्या वर्षी माओवादी चळवळीत सहभागी झाली होती. असीनने तब्बल २६ वर्षे, तर जनिताने १८ वर्षे आपले आयुष्य या चळवळीत घालवले.

विशेष म्हणजे, चळवळीत असताना भूपतीनेच या दोघांचे लग्न लावून दिले होते.जंगलातील खडतर आयुष्य आणि सतत मृत्यूच्या छायेत वावरताना या दोघांचा सशस्त्र क्रांतीवरील विश्वास हळूहळू उडू लागला. तथाकथित क्रांतीतील फोलपणा जाचू लागला. अनेकदा तर आठवडा-आठवडा उपाशी राहावे लागायचे, पावसाळ्यात १५-१५ दिवस पाऊस थांबत नसल्याने प्रचंड हाल व्हायचे.

२०१४ नंतर या दोघांनी माओवादी चळवळीचे तटस्थ निरीक्षण सुरू केले. दरम्यान रोहित वेमुला प्रकरणानंतर देशभरात संविधानावर सुरू झालेल्या चर्चेमुळे असीनने पहिल्यांदाच संविधानाचा गांभीर्याने अभ्यास केला. तो सांगतो, आम्हाला आधी वाटायचे की हे संविधान इंग्रजांकडून उचललेले आहे.

पण जेव्हा मी गडचिरोलीतील पेसा कायदा, वन हक्क कायदा आणि पाचवी-सहावी अनुसूची वाचली, तेव्हा मला कळले की आम्ही ज्या हक्कांसाठी लढत आहोत, ते तर संविधानाने आधीच दिलेले आहेत.

Shirur Crime : तीन वर्षांच्या लहानग्याला शेजारी राहणाऱ्या जोडप्याकडे सांभाळायला दिलेले असताना जोडप्याने मुलासह काढला पळ

मग आपल्याच आदिवासी बांधवांना पोलिसांच्या गणवेशात आणि नक्षलवाद्यांच्या गणवेशात एकमेकांविरुद्ध लढवून काय साध्य होणार होते. हाच विचार मनात पक्का झाल्यावर २०१८ मध्ये या दोघांनी चळवळ सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही तब्बल सहा वर्षे हिमाचल प्रदेशात अज्ञातवासात होते. अखेर महाराष्ट्र पोलिसांच्या पुनर्वसन योजनेवर विश्वास ठेवून २०२४ मध्ये त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शरणागती पत्करली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.