AUS vs BAN : एलिसा-फोबी सलामी जोडीचा द्विशतकी धमाका, ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशचा 10 विकेट्सने धुव्वा
GH News October 17, 2025 01:11 AM

गतविजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवत धमाका केला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील 17 वा आणि आपल्या मोहिमेतील पाचवा सामना विशाखापट्टणममधील डॉ वायएस राजशेखर रेड्डीएसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बांगलादेशचा तब्बल 10 विकेट्सने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीली ही या विजयाची प्रमुख नायिका ठरली. तर फोबी लिचफिल्ड हीनेही कमाल केली. एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड या जोडीने बॅटिंगने कमाल करत ऑस्ट्रेलियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. एलिसाने या दरम्यान खणखणीत शतक झळकावलं.

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 199 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 151 बॉलआधी एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 24.5 ओव्हरमध्ये 202 धावा केल्या. एलिसा हीलीने खणखणीत शतक ठोकलं. एलिसाने अवघ्या 7 चेंडूत 146.75 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 113 धावा केल्या. तर फोबीने 72 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 12 फोरसह नॉट आऊट 84 रन्स केल्या. बांगलादेशकडून एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी एकीलाही ही जोडी फोडण्यात यश आलं नाही.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या बांगलादेशने पूर्ण 50 ओव्हर खेळू काढल्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर त्यांना 200 पारही पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 198 धावांवर यशस्वीरित्या रोखलं. बांगलादेशसाठी शोभना मोस्त्री हीने सर्वाधिक धावा केल्या. शोभनाने नाबाद 66 धावांचं योगदान दिलं. तर रुब्या हैदरने 44 रन्स केल्या. शमीम अक्टर हीने 19 आणि कॅप्टन निगर सुल्ताना हीने 12 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून चौघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर एकीने 1  विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली आणि बांगलादेशला गुंडाळण्यात योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशचा 10 विकेट्सने धुव्वा

ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील पाचवा सामना होता. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत करत विजयी चौकार लगावला. तर ऑस्ट्रेलियाचा एक सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 4 ऑक्टोबरचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला होता. त्यामुळे ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाच्या खात्यात एकूण 9 गुण आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.