कर्वेनगर : मावळे आळी, गोसावी वस्ती, कामना वसाहत, वनदेवी मंदिर जवळील वस्तीभागातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला असतो.
यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषतः सध्या सणांच्या दिवसांत या भागात नागरिकांची ये-जा वाढलेली असते. मात्र, बंद दिव्यांमुळे रस्ते असुरक्षित बनले आहेत. रात्रीच्या वेळी नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांनी उशिरा परतणाऱ्या नागरिकांना अंधारात असुरक्षित प्रवास करावा लागत आहे.
काही ठिकाणी वाहने, दुचाकी उभ्या असतात, ज्यामुळे अंधारात अपघाताची शक्यता आहे, तसेच बंद पथदिव्यांचा फायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तविली आहे. अंधारामुळे या परिसरात महिलांना एकट्याने चालताना भीती वाटते. काही वेळा वाहनचालकांना समोरून येणारे पादचारी दिसत नसल्याने किरकोळ अपघात झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवासी मानसी गुंड सांगतात की, ‘गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही या समस्येची माहिती वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाला दिली आहे. मात्र, अजूनपर्यंत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिकारी पाहणी करतात, पण दिवे मात्र सुरू होत नाहीत.’
नागरिकांच्या तक्रारी
मावळे आळी परिसरातील बहुतांश पथदिवे अनेक दिवसांपासून बंद
अंधारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव
महिलांची व विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात
अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता
स्थानिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
अंधारामुळे परिसरातील व्यापारी, नागरिकांना फटका
तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील पथदिवे बंद आहेत. परिसरातील काही पथदिवे चांगल्या स्थितीत आहेत, तर काही बंद अवस्थेत आहे. लवकर नवीन केबल टाकण्यात येणार असून कर्वेनगरमधील सर्व पथदिवे कार्यरत करण्यात येतील.
- अपर्णा जाधव, शाखा अभियंता