दिवाळीनंतरच मिनी ट्रेन धावणार
पर्यटकांचा हिरमोड, व्यापारी चिंतित
माथेरान, ता. १६ (बातमीदार) ः पावसाने यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे मिनी ट्रेन मेमध्ये बंद करावी लागली होती. दरवर्षी पर्यटकांना निसर्गाचा सुखद अनुभूती देणारी मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरला सुरू होते; पण नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अजूनही सुरू झाली नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर मिनी ट्रेन बंद असली तरी अमन लॉज-माथेरान ही शटलसेवा अखंडित सुरू आहे. अतिवृष्टी होऊनही शटल पर्यटकांना सेवा दिली. येथे सहा हजार मिलिमीटर पाऊस पडला असून मिनी ट्रेन एक दिवसही बंद नव्हती. पर्यटकांनी शटल सेवेतून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतला. पावसाळी चार महिने डब्बे आणि इंजिन दुरुस्ती ही माथेरानमध्येच होत होती. त्यामुळे शटलसेवेत कोणतेही विघ्न आले नाही; पण दिवाळी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू होईल, या आशेने माथेरानकर बसले असून दिवाळी पर्यटनाची हंगाम वाया जाण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे.
----------------------------------------------
पर्यटनाला चालना
१९०७ साली ब्रिटिशकाळात सर आदमजी पिरभाय यांनी रेल्वे माथेरानमध्ये आली. तेव्हापासून दरवर्षी पावसाळ्यात १५ जून रोजी बंद करण्यात येते. पावसाळ्यात दरड हटविणे, रुळाची डागडुजी, अभियांत्रिकी कामांमुळे १५ ऑक्टोबरला मिनी ट्रेन धावत होती. मिनी ट्रेनच्या आकर्षणामुळे माथेरानच्या पर्यटनात कमालीची वृद्धी होते; पण ऑक्टोबरची १६ तारीख उलटूनही मिनी ट्रेन धावली नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.