तळवडेतील वीज उपकेंद्रासाठी जागेचे हस्तांतर
esakal October 17, 2025 08:45 AM

निगडी, ता.१६ : राज्य औद्योगिक विकास मंडळाकडून (एमआयडीसी) तळवडे येथील नवीन उपकेंद्रासाठी जागा भोसरी महावितरण कार्यालयाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्याने तळवडे औद्योगिक परिसराचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
तळवडे औद्योगिक भागासह आसपासच्या परिसरामध्ये वेगाने लघुउद्योगांचा विस्तार होत आहे. त्याने विजेची मागणी वाढून महावितरणच्या यंत्रणेवर ताण येत होता. पर्यायाने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी आणि लघुउद्योजक त्रस्त होते. मात्र, अखेर हा प्रश्न सुटला आहे. तळवडे एमआयडीसी क्षेत्रातील कॅनबे चौक येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणीस आवश्यक असलेली जागा एमआयडीसीकडून भोसरी महावितरण कार्यालयास हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याअंतर्गत एमआयडीसीने ३२०० चौरस मीटर जागा अधिकृतपणे महावितरण कंपनीला दिली आहे. तळवडे एमआयडीसीकडून भोसरी महावितरणला १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जागेचे ताबा पत्र दिले.
तळवडे उपकेंद्राच्या उभारणीमुळे तळवडे एमआयडीसी तसेच परिसरातील वीज पुरवठा योग्य दाबाने होऊन त्यात सुधारणा होईल आणि वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा थांबेल. औद्योगिक उत्पादनावर होणारा परिणाम कमी होऊन स्थानिक व्यवसायांना दिलासा मिळेल. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि लघुउद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

तळवडेच्या ज्योतिबानगर परिसरात मागील पाच वर्षांत लघुउद्योजकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण, वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे उद्योजकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. नवीन वीज उपकेंद्रामुळे हा प्रश्न सुटणार आहे. ही येथील उद्योगांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.
- किर्ती शहा, सचिव, ज्योतिबानगर( तळवडे) आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन

तळवडे, देहूगाव भागांतील वीज वितरण व्यवस्था उभी करण्यासाठी कॅनबे चौकातील प्रस्तावित आवश्यक जागा एमआयडीसीकडून मिळाली आहे. उपकेंद्र मंजुरीसाठी प्रस्तावही दिला आहे. थोड्या दिवसात यंत्रणा उभी केली जाईल. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होईल.
- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.