Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर
esakal October 17, 2025 08:45 AM

थोडक्यात:

  • सीना नदीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ४३०.६ मीटर पातळी गाठून १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर अनुभवला.

  • अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांची हवाई मदतीने सुटका करण्यात आली.

  • सीना-कोळेगाव प्रकल्पातून पहिल्यांदाच १.०४ लाख क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सोडला गेला, जो इतिहासातील सर्वात मोठा विसर्ग आहे.

  • प्रमोद बोडके

    Seine River Flood: केंद्रीय जल आयोगाच्या वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) निरीक्षण केंद्राकडील आतापर्यंतची आकडेवारी आणि यावर्षीच्या सीना नदीच्या महापुराच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे सीना नदीची उच्च पूर पातळी यापूर्वी १९४९ मध्ये ४३० मीटर एवढी नोंदविली गेली होती. यावर्षीच्या महापुराने तब्बल ७६ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. सीना नदीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ४३०.६ मीटर अशी नवी उच्च पूर पातळी तयार केली आहे.

    सीना नदीच्या पाणलोटात येणाऱ्या अहिल्यानगर, कर्जत व जामखेड (जि. अहिल्यानगर), आष्टी (जि. बीड), परंडा व भूम (जि. धाराशिव), करमाळा, माढा, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यात २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ हा कालावधी अविस्मरणीय ठरला आहे. या कालावधीत पाणलोटात झालेली अतिवृष्टी, सीना व तिच्या उपनद्यांना आलेला महापूर अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे.

    या महापुराने सीना नदी काठचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. उन्हाळ्यात जो सीनाकाठ पिण्याच्या पाण्यासाठी तरसतो, त्या सीनाकाठच्या राहूलनगर, सीना दारफळ या गावात आर्मीच्या माध्यमातून हेलिकॉप्टरने नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

    Vasubaras 2025 Rangoli Designs: वसुबारसच्या दिवशी अंगणात काढा सुंदर अन् आकर्षक रांगोळी, पाहा 'या' सोप्या डिझाईन्स

    अहिल्यानगर जवळील ससेवाडी येथे उगम पावणारी सीना नदीचे पाणलोट क्षेत्र अहिल्यानगर, बीड आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात विस्तारले आहे. अहिल्यानगरमधून येणारी सीना नदी सोलापूर, धाराशिव आणि पुन्हा सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदी म्हणजे दुष्काळग्रस्तांची नदी म्हणून ओळखली जाते.

    पावसाळ्यातच जेमतेम वाहणाऱ्या या नदीला अनेकदा हिणवलेही जात होते. ही कुठली नदी, हा तर ओढा आहे ओढा, असे म्हणून सीना नदीची अनेकदा अवहेलना व्हायची. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने सीना नदीने तिची खरी जागा सर्वांनाच दाखवून दिली आहे.

    आकडे बोलतात...

    - जुनी उच्च पू्र पातळी : ४३० मीटर (१९४९)

    - नवी उच्च पूर पातळी : ४३०.६ मीटर (२४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता)

    - सीना नदीची एकूण लांबी : ३७५ किलोमीटर

    - सीना नदीचे पाणलोट क्षेत्र : १२ हजार ७४२ चौरस किलोमीटर

    Veterinary Doctor: पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? जाणून घ्या अभ्यासक्रम अन् किती पगार मिळतो सीना नदी पाणी मिसळणारे प्रमुख स्रोत

    खार ओढा, शेर नदी, मनकर्णा, बाणगंगा, भिंगार नाला, तुक्कड ओढा, विंचरणा नदी, तिरा नदी, साखरी ओढा, भोंगाळा, घोरडा ओढा, बेंद नाला मेहेकरी नदी (मेहेकरी नदी प्रमुख उपनदी) भोगावती नदी

    सीना-कोळेगावमधून सर्वाधिक विसर्ग

    सीना नदीवरील सर्वात मोठा ५.३१ टीएमसीचा प्रकल्प म्हणून परंडा (जि. धाराशिव) तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पाची ओळख आहे. सीना कोळेगाव प्रकल्प ते वडकबाळ हे अंतर १३० किलोमीटर आहे. या धरणातून सोडलेले पाणी वडकबाळला पोहोचण्यासाठी १४ ते १८ तास लागतात.

    या प्रकल्पाच्या माध्यमातून २००७ पासून पाणी अडविले जात आहे. हा प्रकल्प झाल्यापासून सप्टेंबर २०२५ मध्ये पहिल्यांदा सर्वाधिक १ लाख ४ हजार ६०० क्युसेकने २८ व २९ सप्टेंबरला सीना नदीत पाणी सोडले. धरण झाल्यापासूनचा सर्वांत मोठा हा विसर्ग आहे. या धरणातून नदीत पाणी सोडण्याची विसर्ग क्षमता ४ लाख ५० हजार क्युसेक एवढी आहे.

    FAQs

    1. सीना नदीचा पूर इतक्या वर्षांनी का धोक्याच्या पातळीवर पोहोचला? (Why did the Sina river flood reach a danger level after so many years?)
    सप्टेंबर २०२५ मध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीचा पूर ७६ वर्षांतील उच्चतम पातळीवर पोहोचला.

    2. १९४९ मध्ये सीना नदीची पूर पातळी किती होती? (What was the Sina river flood level in 1949?)
    १९४९ मध्ये सीना नदीची पूर पातळी ४३० मीटर इतकी नोंदवली गेली होती.

    3. यंदा सीना नदीने कोणती नवीन पूर पातळी गाठली? (What is the new flood level of the Sina river in 2025?)
    २४ सप्टेंबर २०२५ रोजी सीना नदीची पूर पातळी ४३०.६ मीटरपर्यंत पोहोचली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

    4. सीना-कोळेगाव प्रकल्पातून किती विसर्ग सोडण्यात आला? (How much water was released from the Sina-Kolegaon project?)
    २८ आणि २९ सप्टेंबरला तब्बल १ लाख ४ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला, जो प्रकल्पाच्या इतिहासातील सर्वात मोठा होता.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.