swt176.jpg
N99203
सावंतवाडीः येथील बाजारपेठेतील दुकाने आकाश कंदीलांनी सजली असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सावंतवाडी बाजारपेठ विविध साहित्याने सजली
दिवाळीची चाहूलः नरकासूर बनविण्यात मुले मग्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः हिंदूधर्मीयांचा गणेश चतुर्थी पाठोपाठ आवडता असलेला सण म्हणजे दिवाळी. हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र बाजारपेठामध्ये उलाढाल पाहायला मिळत आहे. सावंतवाडी बाजारपेठेतही या सणाच्या निमित्ताने विविधरंगी आकाश कंदील, फटाके तसेच रांगोळी व रोषणाईच्या साहित्याने सजली आहे.
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दिवाळी सण होय. गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव या सणानंतर येणारा हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये या सणाची उत्सुकता पाहायला मिळत असून सर्वत्र फराळ बनवणे तसेच अन्य साहित्याची खरेदी करण्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. गावागावात, चौका चौकात नरकासुर बनवण्याची लगबग अबाल वृद्धांसह छोट्या मोठ्यांमध्ये सुरु आहे. आकाश कंदील बनवण्यासाठी लहान मुलांमध्ये मोठी आवड पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून नरकासुर व आकाश कंदील स्पर्धांचे आयोजन ठिकठिकाणी दिसून येते त्याची तयारी सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे.
बाजारपेठेचा विचार करता सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठ सजली असून विविध रंगी आकाश कंदील येणारा जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर रांगोळी, विविध रोषणाईचे साहित्य, फटाके, फराळ आदींची दुकानेही शहरांमध्ये थाटली गेली आहेत. बचत गटांच्या फराळांचे स्टॉलही पाहायला मिळत आहे तर कापड दुकानदारांच्या दुकानातही कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध दुकानदारांकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ मोठ्या ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, कापड दुकानदार तसेच होलसेल दुकानदारांकडूनही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
चौकट
पावसाची उसंत; बाजारपेठांत लगबग
पावसाने काहीसी उंसत घेतल्याने ग्रामीण भागात भात कापण्याची लगबग दिसून येत असताना दुसरीकडे दिवाळी सणाच्या तयारीचीही गडबड पाहायला मिळत आहे. यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी शेतीतच जाणार असून भात कापणीला काहीसा फाटा देत दरवर्षी शेतकरीही हा सण उत्साहात साजरा करतात. यावर्षीही ते चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये कमालीची लगबग दिसून येत आहे.