…म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
Marathi October 18, 2025 11:27 PM

सध्या सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं तब्बल 1 लाख 30 हजार रुपये प्रतितोळा एवढं झालं आहे. एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना दुसरीकडे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. तसेच, दिवाळीच्या सणाचा गोडवा जपताना, दिवाळी भेट देताना मिठाई, स्वीट मार्टच्या दुकानातही गर्दी दिसून येते. त्यामुळेच, मिठाईच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या हटके, आणि एकापेक्षा एक सरस गोड पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटत आहे. त्यातच, राजस्थानमधील एका मिठाईचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. त्यावरुन, नेटीझन्स मजा घेत आहेत, तसेच या मिठाईची तुलना चक्क सोन्यासोबत केली जात आहे.

राजस्थानच्या जयपूरमधील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात एक स्पेशल मिठाई लाँच करण्यात आलीय. स्वर्ण प्रसादम असं या मिठाईचं नाव असून तिची किंमतीही सोन्याच्या भावाप्रमाणेच चकाकी आणणारी आहे. या मिठाईचा दर प्रति किलोसाठी 1 लाख 11 हजार रुपये एवढा आहे. त्यामुळे, ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर नेटीझन्सही किंमत पाहून आश्चर्य व्यक्त करत ट्रोलिंगही करत आहेत. जयपूरमधील ही मिठाई सध्या देशातील सर्वात महाग मिठाई आहे. जेवढी दिसायली ही मिठाई प्रिमियम आहे, तितकंच ह्याचं पॅकेजिंगही आकर्षक आहे. ह्या मिठाईच्या पॅकेजिंगसाठी खास “दागिन्यांचा डबा वापरण्यात आला आहे. तर, मिठाई ही चिलगोजापासून बनवली जाते. जो आजचा सर्वात महागडा आणि प्रीमियम ड्रायफ्रूट आहे, अशी माहिती या मिठाई दुकानाच्या मालकीण अंजली जैन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

व्हिडिओवर मजेशीर कमेंट

सोशल मीडियावर ह्या मिठाईचा व्हिडिओ पाहून नेटीझन्स मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने ह्या मिठाईच्या ऐवजी मी एक तोळा सोनं खरेदी करतो, अशी कमेंट केली आहे. तर, एकाने, ह्यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, कारण आता ते खाता येईल, असे म्हटले. तसेच, ही मिठाई खाण्यासाठी आहे की, तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी.. अशीही मजेशीर कमेंट एका नेटीझन्स युजरने केली आहे. दिवाळीनिमित्त सुटट्या एन्जॉय करत सणासोबतच ह्या मिठाईच्या व्हिडिओचाही आनंद नेटीझन्स घेत आहेत.

सोनं प्रतितोळा 1 लाख 31 हजारांवर

दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीला सोन्याची पूजा केली जाते. त्यामुळं सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक विविध पाहायला मिळतात. सोन्याचे भाव 1 लाख 31 हजार 840 आहेत तर चांदीच्या भावात सुद्धा वाढ झाली असून चांदी 1 लाख 76 हजार 130 रुपये इतक्या दरावर आहे असं असलं तरी सुद्धा ग्राहकांकडून आजच्या दिवशी एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळते आहे.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.