कुणी, ‘नोबेल’ देता का रे? ‘नोबेल’?
एका तुफानाला कुणी घर देता का?
एक तुफान ‘नोबेल’वाचून
सन्मानावाचून
जगाच्या सगळ्या मायेवाचून
नोबेल समितीच्या दयेवाचून
देशा-देशांत समेट करत हिंडत आहे
नोबेलपासून कधीच वंचित होणार नाही
अशी शक्कल ढुंढत आहे
त्याला कुणी, ‘नोबेल’ देता का रे? नोबेल?
खरंच सांगतो बाबांनो
हे तुफान आता थकून गेलंय
हमास-इस्राईल वाटाघाटीत
युक्रेन-रशिया भांडाभांडीत
तुफान आता थकून गेलंय
हल्ले-चकमकी-युद्ध-स्फोटांत
अर्ध अधिक तुटून गेलंय
न्यायालयीन हल्ल्यांवरती
चीनच्या गुरगुरण्यावरती
भारताच्या डरकाळ्यांवरती
झेप झुंज घेऊन घेऊन
तुफान आता थकलंय.
केसाचा कोंबडा सावरीत सावरीत
पोकळ धमक्या देतंय
खर सांगतो बाबांनो,
या ‘ट्रम्प’ नावाच्या तुफानाला ‘ट्रम्पपणा’च नडतोय
बाबांनो कुणी ‘नोबेल’ देता का रे? ‘नोबेल’?
एक वेळ ‘व्हाइट हाऊस’ नको
‘टेरिफ’वाढही आता थेट नको,
‘मॅगसेसे’ नको, हार नको,
थैलीमधली भेट नको,
एक हवं शांततेचं नोबेल
अजरामर होण्यासाठी,
त्यानिमित्त हवं एक मानपत्र...
तुफानाची व्याप्ती दिसण्यासाठी
अन् हो, एक विसरू नका बाबांनो
माझ्या नावानं एक पुरस्कारही
सुरू करायला हवाय
माझ्यासारख्या शांतताप्रेमी
जागतिक नेत्यांसाठी
पण त्याआधी
कुणी ‘नोबेल’देता का रे ‘नोबेल’?
Ajit Pawar: आगीतून उठलो अन् फुफाट्यात पडलो, असे म्हणण्याची वेळ येणार नाही! राष्ट्रवादीत येणाऱ्यांना अजितदादांनी दिला शब्द टु बी ऑर नॉट टुबी! To be or not to be that is the question‘नोबेल’ मिळणार की मिळणार नाही?
हा एकच सवाल आहे
या दुनियेच्या शांतता नांदावी यासाठी माझ्या प्रयत्नांना
‘नोबेल’च्या पत्रावळीचा तुकडा कधी तरी मिळेल, यासाठी जगावं माचाडोंचं अभिनंदन करून
बेशरम लाचार आनंदानं?
की फेकून द्यावं ‘नोबेल’ मिळण्याच्या आशेचं लक्तर
त्या हिंद-प्रशांत अन् अटलांटिकच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा ‘टेरिफ’च्या एकाच प्रहारानं?
चीनचा, भारताचा, रशियाचा
अन् शांततेच्या ‘नोबेल’ देणाऱ्या नॉर्वेचाही...
महायुद्धाच्या महासर्पाने पृथ्वीला असा डंख मारावा
की नंतर होणाऱ्या विध्वंसाला नसावा शांतीचा किनारा कधीही...
पण मग..
पण मग त्या
‘विश्वगुरू नमों’ना ‘नोबेल’चं स्वप्न पडू लागलं
तर...? तर...तर...
इथंच मेख आहे.
अन्य कुणालाही ‘नोबेल’ मिळण्याचं दुःख सहन करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो या शांततेच्या वाटाघाटी
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं
इस्राईल, रशिया करत असलेले
गाझा, युक्रेनवरील अत्याचार
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना..
आणि अखेर ‘नोबेल’साठी कटोरा घेऊन उभे राहतो
खालच्या मानेनं एका क्षुद्र देशाच्या दाराशी
विधात्या.. तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला एवढी शांती आम्ही प्रस्थापित केली तरी
ते आम्हाला विसरतात
अन् दुसऱ्या बाजूला ज्यानं मला दुसऱ्यांदा निवडून दिलं ते अमेरिकनही विसरतात.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
माझ्यासारख्या तात्यानं कोणाच्या पायावर डोकं आदळायचं?
कोणाच्या पायावर? कोणाच्या?? कोणाच्या???