पिंपरी, ता. १८ ः मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेत सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले आहे. राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी मुख्याध्यापक संघ सरसावला आहे. संघाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्य गोळा करण्यात आले आणि हा मदतनिधी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाकडे सुपूर्द केला. शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ व संघाचे सचिव गणपत काळे यांनी सांगितले की, ‘‘पूरग्रस्त भागातील मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी संघाने खास शालेय साहित्याचे किट जमा केले. पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खराब झाले होते, ही गरज ओळखून मुख्याध्यापक संघाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.’’ यावेळी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे, खजिनदार अजय रावत उपस्थित होते.
---