माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पूजा गायकवाडला मोठा धक्का, अडचणी वाढल्या
Tv9 Marathi October 19, 2025 03:45 AM

काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली, गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं, दरम्यान या प्रकरणात पूजा गायकवाड सध्या जेलमध्ये आहेत.  तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तिचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती, याच मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणातील आरोपी असलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला आहे.

तिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल,  शिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद यावेळी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांच्याकडून कोर्टात करण्यात आला.  या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे राजपूत यांनी तर आरोपी पूजा गायकवाड हिच्या वतीनं आर. डी. तारके यांनी बाजू मांडली, न्यायालयानं दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर अखेर पूजा गायकवाड हिचा जामीन फेटाळून लावाला आहे, त्यामुळे आता तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. बर्गे यांनी पूजाला अनेकदा मोठी आर्थिक मदत केली होती, मात्र तिला त्यांचा गेवराई येथील ते राहत असलेला बंगला देखील आपल्या नावावर हवा होता.  त्यासाठी ती त्यांच्यावर दबाव निर्माण करत होती, याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.