नाशिक: आयटीआय पुलानजीक नासर्डी नदीच्या काठावर अतिक्रमण करीत उभारलेल्या माजी नगरसेवक व रिपाइं (आठवले गट)चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या दुमजली इमारतीवर महापालिकेने बुलडोझर लावत पाडकाम सुरू केले. या वेळी सातपूर, अंबड पोलिसांसह राखीव पोलिस दलाची तुकडी असा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, बुलडोझरने पाडकाम करण्यात आलेल्या इमारतीपासूनच काही अंतरावर प्रकाश लोंढे याचे ‘धम्मतीर्थ’ हे कार्यालय असून, ते मात्र अद्याप शाबूत आहे. याच कार्यालयात पोलिसांना भुयार सापडले होते. त्यामुळे यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा हातोडा कधी पडतो, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार, त्यानंतर खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करीत प्रकाश लोंढे, दीपक लोंढे या पितापुत्रासह दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तपासणीमध्ये प्रकाश लोंढे याच्या सातपूरच्या आयटीआय पुलानजीकच्या धम्मतीर्थ या संपर्क कार्यालयाची झडती घेतली असता, या ठिकाणी भुयारात दोन बेडरूम, त्यात घातक हत्यारांसह विदेशी मद्याचा साठा आढळून आला होता.
तसेच हे बांधकाम अतिक्रमित असल्याचेही समोर आले होते. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला असता, महापालिकेने याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार, बुधवारी (ता. १५) सायंकाळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येऊन अतिक्रमित दुमजली इमारत पाडण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरू केले.
बुधवारी आयटीआय पुलालगत असलेल्या दुमजली इमारतीवरील जाहिरातीच्या कमानी हटविण्यात आल्या. गुरुवारी (ता. १६) पहाटे सहापासूनच महापालिकेने या दुमजली इमारतीचे पाडकाम बुलडोझरच्या मदतीने सुरू केले. या वेळी पोलिस आयुक्तालयातर्फे तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
रहिवासी बाहेर काढले
आयटीआय पुलानजीकच्या दुमजली इमारतीमध्ये १० ते १२ भाडेकरू राहत होते. या भाडेकरूंना बुधवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत पोलिसांच्या मदतीने महापालिकेने बाहेर काढले. त्यानंतर या इमारतीवर उभारलेली अनधिकृत जाहिरात कमान महापालिकेने उतरविली. गुरुवारी (ता. १६) पहाटे सहापासूनच पोलिसांच्या फौजफाट्याच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दुमजली इमारत तोडण्याचे काम सुरू केले.
‘धम्मतीर्थ’वर हातोडा कधी?
प्रकाश लोंढे याचे धम्मतीर्थ हे दुमजली कार्यालय आयटीआय पुलापासून काही अंतरावर अतिक्रमण करीत उभारले आहे. दहा वर्षांपूर्वी असेच कार्यालय लोंढे याने पुलानजीकच उभारले होते. २०१४/१५ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी ते कार्यालय जमीनदोस्त केले होते. त्या कार्यालयातही भुयार आढळून आले होते. त्याच जागेवर लोंढेने कालांतराने दुमजली मोठी अतिक्रमित इमारत उभारली.
या इमारतीमध्ये १० ते १२ खोल्या काढून त्या भाड्याने दिल्या होत्या. तर याच इमारतीपासून शंभर-दीडशे फूट अंतरावर धम्मतीर्थ हे दुमजली कार्यालय अतिक्रमण करीत बांधले आहे. याच कार्यालयात पोलिसांना भुयार सापडले होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने भाड्याच्या खोल्यांच्या अतिक्रमित इमारतीवर बुलडोझर फिरविला आहे; परंतु लोंढेच्या धम्मतीर्थ कार्यालयावर अतिक्रमणाचा हातोडा कधी फिरतो याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
Nagpur Crime: पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; नेरी येथील थरार, उपसरपंचासह तिघांना चार तासांत अटकलोंढेच्या भुयारी इमारतीला नोटीस
अटकेत असलेल्या प्रकाश लोंढेच्या आयटीआय पुलाजवळ अनधिकृत इमारत उद्ध्वस्त केल्यानंतर तळघर असलेली इमारत उद्ध्वस्त केली जाणार असून महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने लोंढेंच्या या दुसऱ्या इमारतीलाही पाडकामाची नोटीस बजावली. पुढील आठ दिवसात अनधिकृत इमारत हटवली जाणार आहे.