वेस्ट इंडिजला मायदेशात 2-0 ने लोळवल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? याची उत्सूकता आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडू निश्चित असतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते 5 खेळाडू कोण? तसेच संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? जाणून घेऊयात.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या मालिकेनिमित्ताने तब्बल 7 महिन्यांनी वनडे मॅच खेळणार आहे. टीम इंडियाने अखेरचा एकदिवसीय सामना हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळला होता. टीम इंडियाने 9 मार्च रोजी अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता टीम इंडिया थेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.
शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून एकदिवसीय कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. शुबमनच्या नेतृत्वात भारताने याआधी कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-0 ने धुव्वा उडवला होता. तर शुबमनने कसोटी कर्णधार म्हणून इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती.
कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर हे दोघे खेळणार असल्याचं निश्चित आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचंही कमबॅक निश्चित समजलं जात आहे. तसेच केएल राहुल मुख्य विकेटकीपर आहे. त्यामुळे विकेटकीपर म्हणून केएलला वगळून ध्रुव जुरेल याला संधी दिली जाईल, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 5 खेळाडू निश्चित आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल या दोघांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑलराउंडर म्हणून संधी दिली जाऊ शकते. नितीशचा समावेश केल्यास त्याचं एकदिवसीय पदार्पण ठरेल. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव याचा समावेश निश्चित समजला जात आहे. तर मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दिली जाऊ शकते.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेट कीपर), नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.