टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहचली, सरावही केला आणि आता वेळ आहे प्रॅक्टीकल अर्थात सामन्याची. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात ही 19 ऑक्टोबरपासून होत आहे. शुबमन गिल या सामन्यातून एकदिवसीय कर्णधार म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलनंतर टीम इंडियासाठी एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि खास ठरणार आहे. या मालिकेनिमित्ताने आपण टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण किती सामने झाले आहेत? कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकलेत? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियातील आणि एकूणच ऑस्ट्रेलिया विरुद्धची आकडेवारी फारशी चांगली नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताला या 54 पैकी फक्त 14 सामनेच जिंकता आले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने भारताला या 54 पैकी 38 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर उभयसंघात झालेल्या 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलिया मायदेशात सरस असल्याचं सिद्ध होतं.
तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात एकमेव मालिकेत पराभूत केलं आहे. भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वात 2019 साली एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. तेव्हापासून टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे शुबमन गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच एकदिवसीय मालिकेत भारताची ही प्रतिक्षा संपवत ऐतिहासिक कामगिरी करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तसेच टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 152 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 152 पैकी 58 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने भारताला 84 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मायदेशात असो किंवा भारतात असो टीम इंडियावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान उभयसंघातील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील पहिलावहिला एकदिवसीय सामना असणार आहे. आता टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी देणार की यजमान मैदान मारणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.