रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केरळच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 18 धावांवर पाच खेळाडू तंबूत परतले होते. यात चार खेळाडूंना तर आपलं खातंही खोलता आलं नाही. पृथ्वी शॉ, आर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर आणि कर्णधार अंकित बावने हे शून्यावर बाद झाले. पण ऋतुराज गायकवाडने एका बाजूने खिंड लढवली. त्याचं शतक हुकलं पण त्याने केलेल्या 91 धावा संघासाठी संजीवनी ठरल्या. जलज सक्सेनाने या सामन्यात 49 धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतकंही अवघ्या एका धावेने हुकलं. विकी ओस्तवालने 38 आणि रामकृष्ण घोषने 31 धावांची खेळी केली. यासह पहिल्या डावात महाराष्ट्रने 239 धावांची खेळी केली. त्यामुळे केरळ पहिल्या डावात आघाडी घेईल असंच वाटत होतं. पण केरळचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला.
केरळचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. अक्षय चंद्रनला तर खातंही खोलता आलं नाही. कुन्नुमलने 27, अपराजिताने 6 आणि सचिन बेबी 7 धावा करून बाद झाले. मधळ्या फळीत संजू सॅमसनने 54 धावांची खेळी केली. तर कर्णधार अझरुद्दीनने 36 धावा, सलमान निझारने 49 धावांची खेळी केली. तर तळाला फलंदाजीला आलेले अंकित शर्मा 17, एडन एप्प 3 आणि निधीश 4 धावा करून बाद झाले. या सामन्यात केरळने 219 धावा केल्या. महाराष्ट्राला पहिल्या डावात 20 धावांची आघाडी मिळाली. या डावात जलज सक्सेनाने 3, मुकेश चौधरीने 2, रजनीश गुरबानीने 2, विकी ओस्तवालने 2 आणि रामकृष्ण घोषने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या फलंदाजांनी सावध पण चांगली खेळी केली. पृथ्वी शॉने 102 चेंडूत 75 धावा केल्या. तर आर्शिन कुलकर्णी 34 धावा करून बाद झाला. पण सिद्धेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांनी केरळच्या गोलंदाजांचा घाम काढला. दोघांनी नाबाद 55 धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. पहिल्या डावात महाराष्ट्रने 20 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रला 3 धावा, तर केरळला 1 गुण मिळाला आहे. खरं तर हा सामना महाराष्ट्राने ड्रॉ केला म्हणजेच विजयाला गवसणी घालण्यासारखा आहे.