प्रचितगडाची श्रमदानातून स्वच्छता
esakal October 19, 2025 06:45 PM

rat१८p११.jpg-
P२५N९९३७३
संगमेश्वर ः प्रचितगडावरील स्वच्छतामोहिमेत सहभागी संगमरत्न फाउंडेशनचे पदाधिकारी.
----
प्रचितगडाची ‘संगमरत्न’च्या श्रमदानातून स्वच्छता
दोन मोहिमा यशस्वी; २५ व २६ ऑक्टोबरला तिसरी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगडावर संगमरत्न फाउंडेशनने दोन मोहिमा करून श्रमदानातून स्वच्छता केली. पहिल्या मोहिमेत गडाचे मुख्य प्रवेशद्वार दगडमातीने बुजलेले होते ते मोकळे करण्यात आले, गडावर वाटा साफ करण्यात आल्या. दुसऱ्या मोहिमेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या बुरुजाचे काम करण्यात आले. हा बुरूज ७-८ फूट खोल दगडमातीने बुजलेला होता. तो स्वच्छ करण्यात आला. या गडावर स्वच्छतेसाठी २५ व २६ ऑक्टोबरला तिसरी स्वच्छतामोहीम होणार आहे. संगमरत्नचे शिलेदार या दोन दिवसात श्रमदान करून गडाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणार आहेत. अजून बुरुजाचे काम बाकी आहे. येणाऱ्या काळात आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गडावरील प्रत्येक मोहीम इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, गडकिल्ले , दुर्गसंवर्धन अभ्यासक, डॉ. सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात घेत आहेत. या तिसऱ्या मोहिमेत गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील अनावश्यक गवत आणि झुडपे काढणे, वाटेवरील दगडगोट्यांसारख्या अडथळ्यांना बाजूला करणे, गडावरील वाटा मोकळ्या करणे, गडावरील मंदिरपरिसर साफसफाई करणे, गडावरील पाण्याच्या टाक्यांभोवती वाढलेले गवत साफ करण्यात येणार आहे.
---
चौकट
मोहिमेत सहभागी व्हा
संगमरत्न फाउंडेशन या आधी प्रचितगडाच्या स्वच्छतेसाठी दोन मोहिमा यशस्वी केल्या आहेत. या ऐतिहासिक गडाचा सन्मान राखण्याची त्याचे संरक्षण, संवर्धन करण्याची संधी संगमरत्नला मिळाली आहे. गडकिल्ल्यांचे वैभव पुन्हा उभे करण्याची, इतिहासाशी नाळ जुळवण्याची तसेच महाराजांच्या संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन संगमरत्न फाउंडेशन प्रमुख अल्पेश सोलकर यांनी व्यक्त केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.