पापलेट, बांगड्याचे दर वधारलेले
esakal October 21, 2025 10:45 PM

पापलेट, बांगड्याचे दर वधारले
मासळीची आवक घटली ; सुरमई, संरग्याचे दर आवाक्यात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारी नौकांना पापलेट आणि बांगडा फारच कमी प्रमाणात मिळत आहेत. सध्या या दोन्ही माशांचे दर स्थिर आहेत. मात्र पापलेट १२०० ते १३०० रुपये किलो दराने तर ७० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा बांगडा १२० ते १५० रुपये किलो दराने विकला जात असून सुरमई, संरग्याचे दर आवाक्यात आहेत.
समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससिन नेट या मच्छीमार नौका बांगडा आणि म्हाकूळ पकडतात. या पर्ससीन नौकांना ही मासळी फारच क्वचित वेळी चांगल्याप्रमाणात मिळत आहेत. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरु झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील एका आठवड्यात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळाला होता. त्यामुळे हा बांगडा त्यावेळी ७० ते ८० रुपये किलो दराने मिरकरवाडा बंदरात विकला जात होता. आता मात्र या बांगड्यांचा किलोचा दर १२० ते १५० रुपये इतका झाला आहे. पर्ससीन नेट मच्छीमार नौकांव्यतिरिक्त इतर फिशिग नौकांना सध्या सरंगा, सुरमई मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर ४०० ते ४५० रुपये आहे. गेल्या महिन्यात हीच सुरमई ६०० ते ७०० किलो दराने मिळत होती त्याबरोबर ७०० ते ८०० दराने मिळणारा सरंगा मिरकरवाडा बंदारात ५०० रुपये किलो दराने विकला जात होता. सौदाळ्याचे दरही बऱ्यापैकी आवाक्यात आहेत. मोठे सौंदाळे २०० ते २५० रुपये किलो दराने विकले जात होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.