धक्कादायक, मुंबईत फ्लॅटवरील छाप्यात सापडले अणुबॉम्ब डिझाइनचे 14 गुप्त नकाशे, मोठ्या घातपातचा कट?
Tv9 Marathi October 21, 2025 10:45 PM

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण भाभा अणु संशोधन केंद्राचे (BARC) बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद नावाच्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर तपासकर्त्यांना थेट ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट बीएआरसी ओळखपत्र जप्त

गुप्तचर विभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेने अख्तर हुसेन याच्या वर्सोवा येथील फ्लॅटवर धाड टाकली. या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी गुप्तचर विभागाच्या हाती लागल्या आहेत. हुसेन याच्या फ्लॅटच्या झडतीत तपासकर्त्यांना अणुबॉम्बच्या बनावटीशी आणि डिझाइनशी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. ही कागदपत्रे देशाच्या अणुसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय मानली जातात. तसेच अधिकाऱ्यांनी अली रझा होसेनी नावाचे बनावट बीएआरसी ओळखपत्र जप्त केले आहे. या ओळखपत्रावर अख्तरचा फोटो लावण्यात आला होता. या कार्डचा वापर करून अख्तरने बीएआरसी कॅम्पसच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश मिळवला होता का, किंवा संवेदनशील माहिती व प्रतिमा कॅप्चर केल्या होत्या का, याबाबत कसून चौकशी सुरू आहे.

या जप्त केलेल्या नकाशांपैकी काही नकाशे अंधेरीतील एका स्थानिक दुकानात छापण्यात आले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. हे नकाशे नेमके कुठून मिळवले आणि कोणी प्रिंट केले, याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपीच्या घरातून अनेक बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तसेच अनेक मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह देखील जप्त करण्यात आले आहेत.

कसून चौकशी सुरु

सध्या जप्त केलेले सर्व मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह आणि इतर डिजिटल उपकरणे पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या उपकरणांमध्ये आरोपीच्या कारवायांचे आणि संपर्कांचे महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता आहे. अख्तर हुसेन त्याच्या पत्नी आणि मुलासह वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्या कारवायांमध्ये त्यांचा काही सहभाग होता का, याचा तपास सध्या सुरु आहे. सध्या तपासकर्ते याबद्दल कसून चौकशी करत आहेत.

सध्या अनेक केंद्रीय एजन्सी NIA, IB सह या प्रकरणाची संयुक्तपणे चौकशी करत आहेत. आरोपी अख्तरचे आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहेत का, आणि तो कोणाच्या सांगण्यावरून भारताची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता, याचा कसून तपास सुरू आहे. या घटनेने देशाच्या सर्वोच्च वैज्ञानिक आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.