Donald Trump Angry : डोनाल्ड ट्रम्प रागाने लालेलाल, भर पत्रकार परिषदेत कॅमेरामॅनवर भडकले; नेमकं काय घडलं?
GH News October 21, 2025 11:10 PM

Donald Trump Angry : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या आगळ्या वेगळ्या स्वभावामुळे चर्चेत असतात. कधी-कधी ते भर सभेत बोलत असताना एखाद्यावर भडकतात. तर कधी एखाद्या कार्यक्रमात सहकाऱ्याची मस्करी करताना दिसतात. सध्या मात्र ते एका पत्रकार परिषदेदरम्यान चांगलेच रागावल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी एका कॅमेरामॅनला चांगलंच सुनावलं आहे. विशेष म्हणजे अगोदर रागावून त्यांनी नंतर त्याच कॅमेरामॅनची मस्करीदेखील केली आहे. त्यांच्या या कृत्याची सध्या सगळीकडे चर्चा होत असून याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले भाषण थांबवले आणि कॅमेरामॅनवर रागावले. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेदेखील होते. या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. दोघांनीही यावेळी 8.5 अब्ज डॉलर्सच्या खनिजविषयक कराराची घोषणा केली. अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकेसाठी हा करार फार महत्त्वाचा मानला जात आहे. याच घोषणेदरम्यान ट्रम्प एका कॅमेरामॅनवर भडकले.

डोनाल्ड ट्रम्प कॅमेरामॅनवर का भडकले?

पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी बोलत असताना एक कॅमेरा व्हाईट हाऊसमधील एका जुन्या आरशावर आदळला. हे लक्षात येताच ट्रम्प कॅमेरामॅनवर भडकले. “अरे काळजीपूर्वक. त्या आराशाला फोडून टाकशील. तो 400 वर्षे जुना आरसा आहे,” असं ट्रम्प म्हणाले. तसेच पुढे हसत हसत मी माझ्या तिजोरीतून त्याला व्हाईट हाऊसमध्ये घेऊन आलो आहे. तिजोरीतून घेऊन येताच त्याच्यावर कॅमेरा आदळला आहे, असं मिश्किल भाष्य ट्रम्प यांनी केलं. ट्रम्प यांचं हे भाष्य ऐकून पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

अमेरिकेसाठी हा करार फारच महत्त्वाचा

दरम्यान, ऑस्ट्रेलियासोबत झालेला हा खनिजविषयक करार अमेरिकेसाठी मोठे यश मानले जाते आहे. हा करार गेल्या कित्येक महिन्यांआधीच तयार करण्यात आला होता. आता जागतिक पातळीवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भागिदारी आणखी मजबूत झाली आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. सोबतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनीदेखील हा करार अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठीदेखील आर्थिक तसेच तांत्रिक सहकार्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.