टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 19 ऑक्टोबरला पहिल्या एकदिवसीय सामन्यात डीएलएसनुसार 7 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
उभयसंघातील दुसरा सामना हा 23 ऑक्टोबरला एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. बेन ड्वारशुईस दुखापतीमुळे वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. मात्र अद्याप याबाबत आयसीसीकडून माहिती देण्यात आलेली नाही.
बेन ड्वारशुईस याला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून बेन ड्वारशुईस याचा दुखापतीसह संघर्ष सुरुच आहे. ड्वारशुईस या मालिकेतून बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ड्वारशुईसचा पहिल्या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. आता ऑस्ट्रेलियाला ड्वारशुईस टी 20I मालिकेपर्यंत फिट होईल, अशी आशा आहे. उभयसंघात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 5 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे.
ड्वारशुईस व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघातून मॅथ्यू कुहनमॅन याला रिलीज करण्यात आलं आहे. मॅथ्यूला एडम झॅम्पाच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र आता एडम कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे मॅथ्यूला मुक्त करण्यात आलंय.
मॅथ्यूने टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. मॅथ्यूने अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता.
ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हीयर बार्टलेट, एलेक्स केरी, कूपर कोनोली, नॅथन एलिस, जोश हेझलवुड मार्नस लबुशेन, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, एडम जम्पा, मिचेल ओवेन, जोश फिलिप आणि मॅथ्यू रेनशॉ.