चिपळूणमध्ये अभिनय कार्यशाळा
मराठी नाट्य परिषद ; १ व २ नोव्हेंबरला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः मराठी नाट्य परिषद चिपळूणतर्फे १ आणि २ नोव्हेंबरला अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ८ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे ही कार्यशाळा होणार आहे. अभिनयाची आवड असलेल्या तरुणांना आणि इच्छुकांना आता सिनेसृष्टीकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली.
ते म्हणाले, कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अभिनय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकांना कॅमेरासमोर आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी आणि ऑडिशन प्रक्रियेची सखोल माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हे आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. मुंबई आणि पुण्यात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर कोकणात प्रथमच ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेची वैशिष्ट्ये म्हणून कॅमेरा फेसिंग तंत्रज्ञान, ऑडिशन मार्गदर्शन, ऍक्टिंग इम्प्रोवायजेशन तसेच भरपूर प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे.