इंदूर, ता. २० (पीटीआय) ः महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची जबाबदारी उपकर्णधार स्मृती मानधनाने स्वतःवर घेतली. चुकीचा फटका मी मारला आणि तेथूनच भारतीय संघाची घसरण सुरू झाली, अशी निराशा स्मृतीने व्यक्त केली.
रविवारी झालेल्या सामन्यात २८९ धावांचा पाठलाग करताना स्मृतीने स्वतः ८८ धावांची शानदार खेळी करून धावांचा पाठलाग कायम ठेवला होता. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसह १२५ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही लढा दिला. त्यामुळे सामना जवळपास भारताच्या हातात होता. ४१ व्या षटकापर्यंत भारताने तीन बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु ५० व्या षटकांपर्यंत सहा बाद २८४ धावा करता आल्यामुळे चार धावांनी हार झाली.
India Semi Final Scenario : श्रीलंकेच्या विजयाने भारताचा मार्ग सुकर झाला; उपांत्य फेरीत पोहोचण्याचं गणित आणखी सोपं झालंसर्व काही भारताच्या बाजूने घडत असताना स्मृतीने मारलेला उंच फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर भरवशाच्या आणि मॅचविनर असलेल्या रिचा घोषकडूनही चुकीचा फटका मारण्यात आला आणि तिनेही कव्हरमध्ये सोपा झेल दिला. ५० धावा केल्यानंतर दीप्ती शर्मानेही अशीच चुक केली.
माझ्या मते आम्हा सर्वांनी चुकीचे फटके मारले. कोणत्या चेंडूवर कोणते फटके मारायचे याची योग्य निवड करायला हवी होती आणि ही चूक माझ्याकडून सुरू झाली. त्यामुळे याची जबाबदारी मी स्वतःवर घेत आहे, असे स्मृतीने सामन्यानंतर सांगितले.
सर्व काही सुरळीत सुरू असताना आम्हाला चेंडू मागे एका धावेची गरज होती. या वेळी उंच फटके मारण्याचा मोह आवरून एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यायला हवा होता, पण आम्ही घाई केली आणि घसरगुंडीची सुरुवात माझ्यापासून झाली. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारत आहे, असे स्मृती प्रांजळपणे म्हणाली.
SLW vs BANW: २ धावांत ५ विकेट्स पडल्या अन् बांगलादेशने हातचा सामना गमावला; श्रीलंकेने विजयासह आव्हान कायम राखलेमी कव्हरमधून फटके मारण्याचा प्रयत्न करत होते. जो फटका मारून मी बाद झाले त्याची त्या वेळी गरज नव्हती. तसेच फटक्याचे टायमिंगही चुकले. वास्तविक त्या वेळी मी सावधपणे खेळत राहायला हवे होते. खरे तर मी स्वतःलाच संयम राखून खेळायचेय, उंच फटके मारायचे नाहीत, असे स्वतःलाच समजवून सांगत होते, परंतु मी भावनांना आवर घालू शकले नाही आणि नको ती चूक केली, अशी निराशा स्मृतीने व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही सुरुवातीच्या फलंदाजांनी भक्कम पायाभरणी केल्यानंतर भारतीय संघ मोठ्या धावसंखेकडे कूच करत होता, परंतु मधली फळी आणि त्यानंतरच्या फलंदाजांनी असेच चुकीचे फटके मारून विकेट गमावल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यासाठी अनुभवी जेमिमा रॉड्रिग्जला वगळण्यात आले होते. यासंदर्भात विचारले असता स्मृती म्हणाली, जेमिमाला वगळण्याचा निर्णय कठोर होता, परंतु कधी कधी संघ रचना आणि समतोलपणा साधण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.