तिवसा : अमरावती तालुक्यातील धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांनी आज (ता.२०) नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शोले स्टाइलने टॉवरवर चढून आंदोलन केले. गावालगत असलेल्या एका कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानाची परतफेड मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी कंपनीविरोधात घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. तीन वर्षांपूर्वी धानोरा कोकाटे गावालगत एक कंपनी उभारण्यात आली. या कंपनीने येथील शेतशिवारात जाण्या-येण्यासाठी रस्ता व पूल बांधला.
मात्र हे बांधकाम करीत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून कंपनीने मनमानी कारभार केला. ज्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी अन्नत्याग व जलसमाधी आंदोलनदेखील केले होते. यानंतर कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु ते पूर्ण न केल्याने अखेर येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २०) येथील टॉवरवर चढून आंदोलन केले.
Agriculture News : सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पाण्याचे व्यवस्थापन न केल्याने संतापयावेळी शेतकऱ्यांनी जोपर्यंत नुकसानभरपाई मिळणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला. स्वप्नील भुयार, सौरभ कोहळे, गुरुदत्त कोकाटे यांनी टॉवरवर मुक्काम ठोकला आहे. यावेळी शेकडो शेतकरी तसेच पोलिस उपस्थित होते.