भारत आणि ऑस्ट्रे्लिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला आहे. त्यामुळे या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी एडलेड येथे होणारा दुसरा वनडे सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला एलडेल मैदानात खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाने सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. या निर्णायक सामन्यापूर्वी पार पडलेल्या सराव शिबिरात मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एन्ट्री मारली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सराव सत्रात हजेरी लावल्यानंतर ते कोणाशी बोलताना दिसत आहेत. या सरावात अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची फलंदाजीही पाहिली. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत काहीतरी शिजतंय असा अंदाज क्रीडाप्रेमी बांधत आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली तेव्हा रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतलं. या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. शुबमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आणि त्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली. रोहित शर्माने या वर्षीच्या सुरुवातीलाच चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला यश मिळवून दिलं होतं. त्याला अचानक असं काढल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. शुबमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करताना अजित आगरकर यांनी दावा केला होता की, 2027 वनडे वर्ल्डकपसाठी संघाची बांधणी केली जात आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात फेल गेले होते. रोहित शर्मा अवघ्या 8 धावा करून बाद झाला होता. तर विराट कोहलीला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील चांगल्या कामगिरीवर त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. असं असताना अजित आगरकरचं ऑस्ट्रेलियात जाणं काही संकेत तर नाही ना? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तशी शंकाही उपस्थित केली.