'शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलं असेल'; वादानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपवर निशाणा
esakal October 23, 2025 12:45 AM

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम हा पक्ष एकटा निवडणूक लढवणार आहे. तसेच मागील निवडणुकीचा अनुभव पाहता प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडून येण्याच्या हिशेबाने काम करावे, अन्यथा निवडणूक होताच हलगर्जीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याची तंबी एमआयएमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली.

मुंबई सोडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक पार पडली. यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बोधगयेतील महाबोधी महाविहार आमच्या हवाली का केलं जात नाही? 'रामजन्मभूमी'चा दाखला देत भीमराव आंबेडकरांचा थेट सवाल

ते म्हणाले, की आधी एमआयएम पक्ष कुठेच नव्हता; परंतु आज एमआयएम पक्षाने शहर तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष मोठ्या ताकदीने उभा राहून प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार आहे.

प्रभाग रचनेचा फरक पडत नाही

मनपाची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार आहे. निवडणुकीत विरोधकांकडून अनेक उमेदवार उभे करून एमआयएमचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न अगोदर होत असे; परंतु आता तसे होणार नसल्यामुळे विरोधकांची चांगलीच गोची होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा आम्हाला जास्त फरक पडत नसल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला.

नमाज पठण चुकीचे आहे का?

पुणे येथील शनिवारवाड्यात एका कुटुंबाने नमाज अदा केली. त्यामुळे त्या परिवारावर गुन्हा नोंदवण्याचे काम भाजपच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. परंतु, नमाज पठण हा गुन्हा आहे का? या अगोदरही कितीतरी लोकांनी नमाज पठण केलेले असेल. तसेच शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलेले असेल. परंतु, तो काळ वेगळा होता, आता नमाजच्या विषयावरून राज्यातील बोगस मतदार यादी, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी व पुण्यातील तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा हे विषय बाजूला करण्यासाठी भाजपने हा नवीन मुद्दा पुढे केल्याचा आरोपही एमआयएमचे नेते, माजी खासदार जलील यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.