नवरा बायकोचा झगडा आणि त्यातून पत्नीची हत्या झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील बिगडी चौकी येथील हरदी गावात ही भयानक घटना घडली आहे. या घटनेने सर्वच हादरून गेले आहेत. एक वर्षापूर्वीच हिम्मत यादव आणि लक्ष्मी यादवचं लग्न झालं होतं. पण वर्षभरातच हिम्मत आणि लक्ष्मीची डेडबॉडी त्यांच्या घरातच सापडल्याने अख्खं गाव हादरून गेलंय. मृत्यूपूर्वी हिम्मतने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवला होता. त्यात त्याने लक्ष्मीची हत्या केल्याचं आणि स्वत:ही आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं. तसेच दोघांच्याही मृत्यूला त्याने सासू सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. तर, या घटनेमुळे दोन्ही कुटुंबामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिम्मत (28 वर्ष) आणि लक्ष्मी (25 वर्ष) यांचं लग्न गेल्याच वर्षी अत्यंत धुमधडाक्यात झालं होतं. हिम्मत हा हरदी गावचा रहिवासी असून तो शेतकरी आहे. तर लक्ष्मी ही शेजारच्या भागात राहायची. लग्नानंतर दोघांचंही चांगलं चाललं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडत होते. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांना घरातून घाणेरडा वास येऊ लागल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा दोघांचेही मृतदेह आढळून आले. लक्ष्मीच्या गळा आणि मानेवर मारल्याच्या खुणा होत्या. यावरून लक्ष्मीची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचं स्पष्ट होत होतं. तर हिम्मतच्या शरीरावर एकही व्रण नव्हता. पण त्याच्या मोबाईल स्टेट्सने संपूर्ण खूनाचं रहस्यच उघड केलं.
आता मला जगायचं नाहीये…
हिम्मतने ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेट्स अत्यंत धक्कादायक होतं. मी माझी पत्नी लक्ष्मीची हत्या केली आहे. सासूसासऱ्यांमुळेच मला हे करावे लागले. आता मला जगायचं नाहीये, असा स्टेट्स हिम्मतने ठेवला होता. काही तासांपूर्वीच त्याने हा मेसेज ठेवला होता. पोलिसांनी पुरावा म्हणून या स्टेट्सचा स्क्रिनशॉट काढला आहे. हे हत्या आणि आत्महत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी हिम्मतच्या सासूसासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पण दोघांनीही या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाच्या आणखी खोलात जाण्यासाठी पोलीस मोबाईल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत.
गावात सन्नाटा…
शेजाऱ्यांच्या मते, लग्नानंतर लक्ष्मीला सासरच्यांकडून टोमणे मारले जात होते. तिच्याकडून हुंडा मागितला जात होता. पण हिम्मतने तिला कधीच काही म्हटलं नाही. हिम्मतचा भाऊ रामू यादव याने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भाऊ खूप त्रस्त होता. काही दिवसांपासून तो शांत राहत होता. घरात काही तरी काळंबेरं आहे, याचा आम्हाला संशय आला होता, असं रामूने सांगितलं. दरम्यान, या घटनेमुळे गावात सन्नाटा पसरलाय. हुंडाबळीचे प्रकार रोखण्यासाठी गावागावात जनजागृती अभियान राबवण्याची मागणी महिलांनी केली आहे.
पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूमागचं नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, सासू सासऱ्यांच्या विरोधात हत्या आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.