महाराष्ट्रात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. एकीकडे ऑक्टोबर हीट सुरु असताना दुसरीकडे तापणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली. राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील 4 दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना छत्री आणि रेनकोट घेऊन फिरावं लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस येत्या २२ ते २५ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिले आहे. विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?आज 22 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर,धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या ठिकाणी यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. यानंतर गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम ,यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर ,गोंदिया, गडचिरोली या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच 24 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोलीत पावसाचा यलो अलर्ट असेल. तर 25 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यताआज पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि गडगडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच साताऱ्याच्या घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.