INDW vs NZW : भारत न्यूझीलंड दरम्यान करो या मरोची लढाई, कुठे आणि कधी पाहता येईल सामना? जाणून घ्या
Tv9 Marathi October 23, 2025 04:45 AM

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाचा उपांत्य फेरीच्या दृष्टीने प्रवास सोपा होणार आहे. त्यामुळे हा सामना करो या मरोची लढाई आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असून स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहे. 23 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. भारत शेवटचा सामना बांगलादेशशी आणि न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर न्यूझीलंडने पाच पैकी एका सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले. भारताचे 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.526 आहे. तर न्यूझीलंडचे 4 गुण असून नेट रनरेट हा न-0.245 आहे. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे समजतं… चला जाणून घेऊयात हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

भारत आणि न्यूझीलंड सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल. तर नाणेफेकीचा कौल होईल. या सामन्याचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तर लाईव्ह स्ट्रिमिंग जिओस्टार आणि वेबसाईटवर असेल.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड महिला संघात आतापर्यंत 57 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंडने 34 सामने तर भारताने 22 सामन्यात विजय मिळवला आहे. यापैकी एक सामना बरोबरीत सुटला आहे. यावरून वनडे क्रिकेटमध्ये भारतापेक्षा न्यूझीलंडचं वजन अधिक आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला संघाचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर/अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, क्रांती गौड/राधा यादव, श्री चरणी.

न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, ली ताहुहू, एडन कार्सन, रोझमेरी मायर/ब्री एलिंग.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.