टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, अष्टपैलू हार्दिक पांड्या टी20 मालिकेत खेळण्यासाठी रेडी
Tv9 Marathi October 23, 2025 04:45 AM

हार्दिक पांड्या आणि दुखापत हे समीकरण गेल्या काही वर्षात जुळून आलं आहे. मोठ्या स्पर्धांदरम्यान हार्दिक पांड्याच्या मागे दुखापतीचं शुक्लकाष्ठ लागलं आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्या आशिया कप स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिकेसाठी त्याचा विचार केला गेला नाही. आता हार्दिक पांड्या फिट अँड़ फाईन असून लवकरच टीम इंडियात पदार्पण करेल असं सांगण्यात येत आहे. पण यासाठी चार आठवडे बंगळुरुतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये घालवावे लागणार आहेत. त्यानंतर टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग मोकळा होईल. हार्दिक पांड्या मागच्या आठवड्यात सीओईमध्ये दाखल झाला होता. पण दिवाळीसाठी काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. 22 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रशिक्षण सुरु केलं आहे.

हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला असून आता कधी पुनरागमन करेल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा संघ पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान दक्षिण अफ्रिका दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर 5 सामन्यांची टी20 मालिकाही होणार आहे. हार्दिक पांड्या 30 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला क्वॉड्रिसेप्सच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रियेची गरज नाही. त्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली रिहॅबिलिटेशन सुरु केलं आहे.

हार्दिक पांड्या आशिया कप स्पर्धेत दुखापतग्रस्त

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज आणि आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकला होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यातही त्याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे फलंदाज प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी खंत व्यक्त केली होती. सीतांशु कोटक यांनी सांगितलं की, हार्दिकसारखा खेळाडू नसणं ही संघासाठी मोठी उणीव ठरते. पण तुम्ही सकारात्म पैलू पाहाल तर नितीशला काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. आम्ही त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. तो चांगली तयारी करत आहे. पण हार्दिकसारख्या खेळाडूची उणीव भासते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.