Asia Cup Trophy Controversy : अफगाण, श्रीलंकेचा पाठिंबा, तरीही नक्वींचा अडेलतट्टूपणा; आशिया कप देण्यास नकार कायम, BCCI मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
esakal October 23, 2025 08:45 AM

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी बीसीसाआयला पाठिंबा दिला, तरी आशिया क्रिकेट परिषदेचे पाकिस्तानी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अडेलतट्टूपणा कायम राहिला आहे. त्यामुळे आशिया करंडक विजेत्या भारतीय संघाला देण्यावरून निर्माण झालेला पेच सुटलेला नाही. दुबई येथील आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयातून आपल्या हस्तेच आशिया करंडक स्वीकारावा, अशी भूमिका नक्वी यांनी घेतलेली आहे.

नक्वी यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसा आदेशही दिलेला आहे; परंतु बीसीसीआयने त्यांच्या अशा अडेलतट्टू भूमिकेचा निषेध केला आहे. सरळमार्गी हा करंडक भारतीय संघाला मिळावा, असे प्रयत्न बीसीसीआयकडून केले जात आहेत; मात्र तसे झाले नाही तर पुढील महिन्यात होत असलेल्या आयसीसीच्या बैठकीत नक्वी यांना घेरण्याची तयारी बीसीसीआयने केली असल्याचे समजते.

Asia Cup 2025 Trophy Controversy : ट्रॉफीचोर मोहसीन नक्वीला दुबई पोलीस ठोकणार बेड्या? BCCI मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत...

बीसीसीआयचे सचिव आणि बीसीसीआयचे आशिया क्रिकेट परिषदेतील प्रतिनिधी राजीव शुक्ला यांच्यासह इतर काही देशांच्या मंडळासह आता श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याही प्रतिनिधींनी नक्वी यांनी पत्र लिहून करंडक बीसीसीआयच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे; पण नक्वी यांचा नकार कायम राहिला आहे. बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीने दुबईत येऊन माझ्या हस्ते हा करंडक स्वीकारावा, असा पुनरुच्चार यांनी केला आहे.

Asia Cup Trophy Controversy : ट्रॉफीचा ड्रामा संपेना! नक्वींनी पुन्हा टीम इंडियाला डिवचलं, BCCIनेही सुनावले खडेबोल; ACCच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

जय शहा अध्यक्ष असलेल्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा आता गाजणार हे तेवढेच निश्चित झाले आहे. आशिया करंडक ट्रॉफी सध्या आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून करंडक स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा नक्वी यांनी करंडक घेऊन मैदानातून पळ काढला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.