Zilla Parishad Election: सर्वच गट सर्वसाधारण सुटल्याने इच्छुकांची भाऊगर्दी; युती, आघाडीकडे सर्वांचे लक्ष
esakal October 23, 2025 08:45 AM

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळावी. यासाठी इच्छुकांनी पक्षांच्या नेत्याकडे जोरदार लॉबिग करणे सुरू केले आहे. काही इच्छुकांना उमेदवारीचे ग्रीन सिग्नल आपल्याला मिळेल, अशा पद्धतीने मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Nashik Elections : ऐन दिवाळीत नात्यांमध्येच 'सुरसुरी' पेटली! नाशिक जि. प. निवडणुकीत सख्खे भाऊ, काका-पुतण्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच

घनसावंगी तालुक्यात सर्व जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यातील काही जणांनी कामालाही सुरवात केली आहे; परंतु यातही अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. निवडणूक गट व निर्वाचक गणांमध्ये कोणता उमेदवार निश्चित करावयाचा याबाबत राजकीय पक्षासमोर मोठे आवाहन निर्माण होत आहे. काही इच्छुकांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी तालुका पातळीवरील नेत्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांकडे वजन वापरले जात आहे.

तालुक्यातील सात निवडणूक गट व १४ निर्वाचक गण आहे तर एकाच पक्षाकडून इच्छुकांची संख्या पाहता अनेकांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आपलीच उमेदवारी निश्चित व्हावी, यासाठी इच्छुक दररोज पक्षांच्या नेत्याकडे खेटे घालत आहे. काही गटामध्ये सक्षम उमेदवार मिळाल्याने त्यांना कामाला लागा असेच आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. इच्छुक मतदारांच्या भेटीगाठी घेत फिरत आहे. गावातील किती मतदार, कोणत्या समाजाचे किती मतदार, याबाबतची चाचपणी संबंधित उमेदवारांकडून सुरू आहे. मागील काळात ज्या उमेदवारांनी कामे केली नाही त्याच्या निष्क्रियता इच्छुक उमेदवाराकडून दाखवली जात आहे.

येत्या काळात कोणाला उमेदवारी मिळेल यावर अनेक साशंकता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मिळविताना दुसऱ्या भागातून स्थलांतरित उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वरिष्ठाकडून त्या भागातील किंवा इतरत्र भागातील उमेदवार लादला जातो का? हे आगामी काळात दिसणार आहे. दुसरीकडे तालुक्यात सर्वच पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेना व भाजपचे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. या दोनही पक्षांतून कार्यकर्ते उत्साही असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला युतीत सामील केले जाते का? किती जागा सोडण्यात येतात हे आगामी काळात दिसणार आहे. वरिष्ठ पातळीवर युती-आघाडी झाली तर आपल्याला तिकीट मिळणार की नाही याची शंका आहे. त्यामुळे अनेकांनी पक्षप्रवेशाबरोबरच अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

Kolhapur Politics : धनंजय महाडिक आणि राजेश क्षिरसागर यांच्यात वर्चस्वासाठी लागणार स्पर्धा, महायुतीतच बेबनाव समजूत काढताना होणार दमछाक

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकत पाहता आघाडीची शक्यता धूसरच आहे. मात्र, तरीही आघाडी झाल्यास काँग्रेस, शिवसेना  (उबाठा) यांना किती जागा मिळतात. तसेच महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आल्यास उमेदवारीसाठी मोठी कसरत होणार आहे. यामुळे अनेकांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यातच बंडखोरीची शक्यताही राहणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.